फुणगूस बंदरावर जेटी उभारुन जलपर्यटन केंद्र करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाडीचा बदलणारा प्रवाह आणि दरवर्षी येथील बाजारपेठेला बसणारा पुराचा फटका पाहता फुणगूस बंदराला सुमारे 100 मीटर लांबीची जेटी उभारल्यास येथील बाजारपेठ तसेच घरांना पूर्ण संरक्षण मिळेल तसेच निसर्गसौदर्याने नटलेल्या या खाडीपरिसरात एक उत्तम जलपर्यटन केंद्र तयार होऊन रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. त्यामुळे शासनाने पूरपरिस्थिती निवारणसाठी दिलेल्या निधीतून येथील जेटी विकसित करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

मुळातच हा भाग अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. फुणगूस येथील शास्त्रीनदीचे कुरधुंडा गावापासून खाडीत रूपांतर झाले आहे.कालांतराने खाडीपात्र गाळाने भरून पाण्याचा प्रवाह बदलला आहे. 100 मिमी पावसात देखील पुराचे पाणी येथील जुनी बाजारपेठ आणि खाडीलगतच्या घरामध्ये घुसून दरवर्षी प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे.गेल्या दोन तीन वर्षात तर परिस्थिती भयानक बदलली असून पाण्याचा प्रवाह वेगाने घुसून जमिनीची धूप होतानाच खाडीकिनाराही पोखरून काढत आहे.त्यामुळे येत्या काळात हा फार मोठा धोका ठरणार आहे.

या धोक्यामुळे येथील बाजारपेठ विस्थापित होऊन ग्रामस्थ बेरोजगार झाले आहेत.परंतु येथील पिढ्यानपिढ्याची घरे कशी विस्थापित करणार ? खाडीलगतच्या भात पीक, भाजीपाला शेतीचे काय करणार ?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले असून त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे फुणगूस बंदरावर जेट्टी उभारणे हा ठरणार आहे. पुरापासून संरक्षण मिळण्यासाठी संसरक्षण भिंती उभारण्यापेक्षा जेटीचा पर्याय हा संरक्षण तसेच विकासाचा मार्ग मोकळा करणारा ठरणार आहे. फुणगूस हे ब्रिटिशकाळात प्रसिद्ध बंदर होते. त्यामुळे येथे लॉंच आणि गलबतांसाठी मेरिटाईम बोर्डाने जेटी उभारली आहे. तसेच या जेटीच्या सुमारे 100 मीटर अंतरावर होडी वाहतूक आणि मच्छीमारी होडीसाठी देखील एक छोटी जेटी बांधण्यात आलेली आहे.मात्र या दोन्ही जेटी आता जीर्ण आणि धोकादायक बनल्या आहेत. लॉंच आणि होडी वाहतूक बंद पडली आणि पुरामुळे येथील बाजारपेठ देखील विस्थापित झाल्याने कमकुवत व जीर्ण झालेल्या जेटीकडे आता सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.

मात्र पर्यटन दृष्टीने विचार केल्यास येथे मोठी संधी असल्याने येथे जेटी उभारल्यास फुणगूस बंदर पुन्हा एकदा रोजगार देण्यासाठी व लगतच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होऊ शकते. त्यासाठी फक्त येथे सुमारे 100 ते 150 मीटर लांबीची एकच जेटी उभारावी लागणार आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीच्या धर्तीवर जर येथे जेटी उभारली गेली, तर येथील जुन्या बाजारपेठेचे तसेच खाडीलगत असलेल्या घरांचे पूर्ण संरक्षण होणार आहे. पाण्याच्या प्रवाह थांबून पुन्हा मूळ नदीपात्राकडे वळेल. किनाऱ्याची धूप थांबेल.व दरवर्षी येणाऱ्या पुरापासून देखील मुक्ती मिळेल.

लांबच लांब जेटी बांधली गेली आणि येथे दिवाबत्तीची व्यवस्था झाली तर ही जेटी एक उत्तम पर्यटन केंद्र बनेल.खाडीपरिसराचे मनमोहक निसर्गसौदर्य आणि खाडीत होडीद्वारे मनमुराद सफरीचा आनंद पर्यटकांना घेता येईल त्यामुळे अनेक छोटे छोटे रोजगार उपलब्ध होतील. मच्छिमारी व्यवसायाला चालना मिळेल.आणि मुख्य म्हणजे फुणगूसची बाजारपेठ पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊन विकासाची दालने खुली होतील.त्यासाठी येथे जेटी विकसित होणे गरजेचे आहे असे खाडीभागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.