
‘हिंदू हे गोमूत्र पिणारे आणि शेणाची पूजा करणारे आहेत’ असे बेताल विधान अमेरिकेतील एका रेडिओ वाहिनीच्या कार्यक्रम निर्मातीने केली आहे. फुरकान खान असे या महिलेचे नाव असून तिने हिंदूवर ट्विटरद्वारे टीका केली होती. तिच्या ट्विटनंतर जगभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी फुरकानवर आणि ती काम करत असलेल्या नॅशनल पब्लिक रेडिओवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
हा सगळा प्रकार 9 सप्टेंबर रोजी सुरू झाला. फुरकानने ट्विट केलं ज्यात तिने म्हटलं ‘की हिंदुस्थानी नागरिकांनी हिंदुत्व सोडले तर ते त्यांच्या अनेक समस्या सोडवणारे असेल. गोमूत्र पिऊन आणि शेणाची पुजा करून काय होणार आहे?’ तिच्या या ट्विटनंतर अमेरिकेतील हिंदूंमध्ये संतापाची जबरदस्त लाट उसळली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की अनेक श्रोत्यांनी वॉशिंग्टनमध्ये असलेल्या एन.पी.आर च्या कार्यालयाकडे तक्रारी करायला सुरुवात केली.
तक्रारींची वाढती संख्या बघून एन.पी.आरचे प्रशासनही हादरून गेले होते. या तक्रारींमुळे आणि ट्विटरवरून फुरकानवर व्हायला लागलेल्या सडकून टीकेमुळे तिची जाम तंतरली होती. तिने ताबडतोब तिचे ट्विट डिलीट केले. मात्र तिच्यावर तरीही टीकेचा भडीमार होत राहिला, ज्यामुळे तिने पुन्हा ट्विटरचा आधार घेतला आणि माफी मागितली. हिंदू आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागणारे ट्विट केले. ज्यात तिने म्हटले आहे की ‘मी माझ्या आधीच्या ट्विटसाठी मनापासून माफी मागते.माझे ट्विट वाईट होते आणि कोणीही स्वीकार करू शकणार नाही असेच होते. हिंदुत्ववादावर टीका करणे किंवा लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश बिलकुल नव्हता. हे ट्विट माझी नितीमूल्ये दर्शवणारे नाहीये. मला कृपया माफ करा. मी काही दिवस ट्विटरपासून लांब राहणार आहे’
I wholeheartedly apologize for my tweet earlier. It was ill considered & unacceptable. I deleted it. I didn’t mean to disparage Hinduism or hurt anyone’s feelings. It doesn’t reflect my beliefs and principles. Please accept my sincere regret. I’ll be off Twitter for a while.
— Furkan Khan (@Furkan_Khan) September 11, 2019
फुरकानने माफी मागितल्यानंतरही हिंदुत्ववाद्यांचा राग कमी झालेला नाहीये. जैश ए मोहम्मदचे दहशतवादी हिंदूंबद्दल गरळ ओकताना नेहेमी गोमूत्र पिणारे असा उल्लेख करत असतात. नेमका तोच उल्लेख फुरकानने का केला अशा खडा सवाल या हिंदुत्ववाद्यांनी केला आहे. फुरकानवर संतापलेल्या एका ट्विटर वापरणाऱ्याने तिला सुनावताना म्हटले आहे की ‘हिंदुस्थानात राहून हिंदूंवर टीका करणं सोपं झालंय.मुस्लिमबहुल देशात जाऊन तुम्ही मुसलमानांची अशी निंदा करू शकाल का ?’
हिंदुत्ववाद्यांचा संताप पाहिल्यानंतर फुरकानने तिला काढून टाकण्याआधीच राजीनामा देऊन टाकला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदूविरोध किती आहे हे दिसतंय आणि जगाला हे दाखवून देण्यासाठी या घटनेचा वापर आम्ही करू असं काही हिंदुत्ववाद्यांनी म्हटले आहे.



























































