भविष्यातील युद्ध आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय पटवर्धन

अतिशय वेगवान अस्त्रांनी लढल्या जाणाऱ्या भावी युद्धांमध्ये सत्वर चोख माहिती मिळवून कमीत कमी वेळेत त्याचे पृथक्करण करून सैनिकांना देणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. शत्रूला पराभूत करण्यासाठी रशियाने युक्रेनमध्ये टँक्स मॅनुव्हर्स आणि आर्टिलरी, मिसाईल बम्बार्डमेंटचा वापर केला, पण अमेरिका, नाटो राष्ट्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरली. त्यांनी पोलंडमध्ये ‘टॅक्टिकल इंटेलिजन्स टार्गेटिंग ऍक्सेस नोड’अंतर्गत एक ग्राउैंड स्टेशन स्थापन केले आहे. त्या स्टेशनला विविध युद्धस्थळांवरील सेन्सर्स आणि डेटा सोर्सेसमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे हे लोक युक्रेन सैन्याला पलटवार करण्याचे आदेश आणि इशारे देत आहेत. सध्याच्या जगात या माहितीद्वारे तुम्ही शत्रूवर सामरिक कुरघोडी करू शकता हे सिद्ध होताना दिसत आहे.

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातही इंटेलिजन्स ऍनालिसिसचे महत्त्व उघड झाले आहे. काही वर्षांपूर्वीच झालेल्या चेचेन युद्धात तेथील बंडखोरांच्या उघड संभाषणातूनच (ओपन कम्युनिकेशन) रशियन सैन्य त्यांचा ठावठिकाणा व कारवाईसंबंधी माहिती मिळवून त्यांचा सफाया करीत असे. असे असतानाही युक्रेन युद्धात रशियन लष्कराचा खुला (अनसिक्युअर्ड) रेडिओ चॅनेल्सच्या वापर कोड्यात टाकणारा ठरला आहे.

रशिया-युक्रेन युद्धात लढणाऱ्या रशियन सैनिकांचे एक संभाषण मध्यंतरी सोशल मीडियावर गाजले. हे सर्व संभाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पकडले गेले. युक्रेन युद्धात गुप्त किंवा सांकेतिक भाषेऐवजी स्वभाषेत झालेल्या अनेक संभाषणांचे पृथक्करण अमेरिका व मित्रराष्ट्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करीत आहेत. फक्त संभाषणच नव्हे तर व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडियावर पडणाऱ्या पोस्ट आणि फोटो यांचाही त्यात समावेश आहे. रशियन सैनिकांचे सोशल मीडियावर गाजलेले ‘रेडिओ संभाषण’ अमेरिकेच्या प्रायमर या कंपनीने पकडले होते.

मागील दशकात या संपूर्ण क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झाली आहे. ट्रेनिंग डेटा ऍनालिसिस, प्रतिमा संशोधन, स्पीच ट्रान्सक्रिप्शन, भाषांतर आणि भाषा प्रक्रिया या संकल्पनांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ‘न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम’ प्रणालीची भूमिका महत्त्वाची आहे. युक्रेन युद्धात तर त्याचा प्रचंड वापर होत असल्याचे समोर येत आहे. अत्यंत वेगाने होणारे शत्रूकडील माहितीचे पृथक्करण ‘गेम चेंजर’ ठरेल यात शंका नाही.

प्रायमर ही अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सांकेतिक शब्द, संभाषण यांचे भाषांतर करणारे न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम बाजारपेठेत विकत आहे. या कंपनीच्या ‘ट्रान्सफॉर्मर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लार्ंनग मॉडेल’मध्ये लांबलचक व गुप्त शब्दमाळेला (लॉन्ग स्ट्रिंग ऑफ जम्बल्ड वर्डस्) वाक्यात बदलल्यावर त्याला भाषांतरित करून प्रिंट करण्याची क्षमता आहे. मात्र कंपनी मुख्य व्यवस्थापक शॉन गौरले यांच्यानुसार युक्रेन युद्धासाठी या कंपनीच्या तंत्रज्ञांना रेडिओ संभाषणातील वाक्फितींच्या (ऑडिओ) ध्वनिलहरींना पकडून त्यांना वृत्तलहरींमध्ये परिवर्तित करणे, त्या संभाषणातील इतर आवाज, संगीत, बडबडीचा डिस्टर्बन्स कमी करणे, रशियन बोलीचे भाषांतर आणि छपाई करणे या कामांबरोबरच त्या भाषेतील युद्धभूमीसंबंधित शब्द, वाक्प्रचारांना अधोरेखित करणारी सॉफ्टवेअर्स मुद्दाम बनवावी लागली होती. त्यात आजही संशोधनात्मक सुधारणा सुरूच आहेत.

या मॉडेलमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क प्रणालीचा (व्हीपीएन सिस्टीम) वापर केला जातो. यामध्ये वापरणारा, बोलणाऱ्याचा इंटरनेट ट्रफिक गुप्त (एक्रिप्टेड) असतो. बोलणारा कोण हे इतरांना कळत नसल्यामुळे तुमचे संभाषण किंवा जागेचा पत्ता शत्रूला लागू शकत नाही. ही माहिती सामान्य इंटरनेट ट्रफिकपासून स्वतंत्र असलेल्या होस्ट सर्व्हरकडे पाठवली जाते. तेथून ती इतरांकडे जात असल्यामुळे ट्रफिक, बोलणे आपोआप गुप्त होते. शॉन गौरले यांचा दावा खरा मानला तर युक्रेन युद्धानंतर या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स प्रवेश करतील. कारण या क्षेत्राचा या युद्धात कस लागला आहे आणि त्याची युद्धपात्रता (बॅटलवर्दिनेस) सिद्ध झाली आहे. प्रायमर कंपनीने ही प्रणाली इतर काही राष्ट्रांनाही दिली आहे, पण कोणाला, कशासाठी आणि केव्हा हे सांगण्यास गौरले यांनी नकार दिला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मिळालेले खुले संभाषण, स्मार्टफोन व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोटो यांच्या मदतीने माहिती कशी गोळा केली जाऊ शकते, त्याचप्रमाणे या माहितीचा योग्य वापर केल्यास काय फायदा होऊ शकतो हे युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्सला मिळवणे, त्याची योग्य वर्गवारी करणे आणि त्याचे पृथक्करण करून कमीतकमी वेळेत योग्य त्या सैनिकांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे, पण कठीण काम आहे. मशीन लार्ंनग टूल्समुळे इमेजरी ऍनालिसिस सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मिळालेल्या चित्रांची व त्यातील माहितीची वर्गवारी करणेही आता सोपे झाले आहे. प्रायमर कंपनीने संवाद आणि भाषांतराचे सॉफ्टवेअर विकसित करून आज तरी इतर सर्वांवर कुरघोडी केली आहे.

युक्रेन युद्धामुळे एक अजून बाब समोर आली आहे. आजतागायत युद्धभूमीवरील सिग्नल कम्युनिकेशन प्रत्येक राष्ट्राच्या स्वतःच्या सिग्नल युनिट्सकडे असायचे. हिंदुस्थानात आजही हीच परिस्थिती आहे. या सर्व राष्ट्रीय सिग्नल युनिट्सकडे विविध संगणकीय कलाबाजीची टूल्स असतात, पण युक्रेन युद्धासाठी अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी सिग्नल कम्युनिकेशन टॅप करण्याची जबाबदारी प्रायमर नावाच्या खासगी अमेरिकन कंपनीला दिली. सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि इमेजरीसाठी उपग्रहांचे संचलन करणाऱ्या इतरही काही कंपन्या अमेरिका, नाटो, युक्रेनला त्या सेवा पुरवत आहेत. उद्या या कंपन्या हे तंत्रज्ञान अमेरिका, नाटो, युक्रेनच्या शत्रूंना विकणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण काहीही करून नफा मिळविणे हेच अशा कंपन्यांचे ध्येय असते.

आजमितीला हिंदुस्थानी लष्कर उत्तर सीमेवर चिनी भाषा (मॅन्डरिन डायालेक्ट) तसेच काही युरेशियन देशांमधे प्रचलित रशियन, त्यांच्या स्वतःच्या भाषा आणि पश्चिमेत पश्तून, अफगाण, अरब, चेचेन भाषेत बोलणाऱ्या शत्रू आणि आतंकवाद्यांना तोंड देत आहे. आपल्या नागरी व लष्करी इंटेलिजन्स एजन्सीज त्यांच्यातील रेडिओ/मोबाईल, सॅटेलाईट फोनवर होणारे आपापसातील संभाषण ऐकतात, पकडतात. त्या संभाषणांच्या ध्वनिमुद्रित फिती क्षेत्रीय व दिल्लीतील मुख्यालयात पाठवल्यावर त्यांचे पृथक्करण व विश्लेषण होऊन ती माहिती परत सीमेवर तैनात सैनिकांपर्यंत पोहोचायला किमान पाच ते सहा दिवस लागतात. ती माहिती जेव्हा आमच्यासारख्यांच्या हाती येते त्यावेळी आम्हाला ‘अब पछताये क्या होत जब चिडिया चुग गई खेत’सारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. यावर मात करण्यासाठी हिंदुस्थानलाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरणे क्रमप्राप्त आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली विकसित करणे आणि निदान माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लष्कराला चीनपेक्षा तुल्यबळ बनवणे ही सामरिक गरज आहे.

हिंदुस्थानी संगणक तज्ञ, तंत्रज्ञ अतिशय हुशार आहेत. किंबहुना प्रायमर आणि विविध पाश्चिमात्य कंपन्यांमध्येही अनेक हिंदुस्थानी तंत्रज्ञ कार्यरत आहेत. ते तेथील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासात हातभार लावत असतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. फक्त आवश्यकता आहे ती अशा तज्ञ आणि तंत्रज्ञांना विद्यापीठ स्तरावर ओळखण्याची, शोधण्याची, त्यांना टॅप करण्याची आणि सेवेत घेण्याची. केवळे ‘‘ब्रेन ड्रेन होत आहे’’ अशी ओरड करून देशाची सामरिक व तांत्रिक प्रगती होत नाही. तरुण बुद्धिमत्तेला हुडकून आपल्याच देशात कार्यरत केले तरच या क्षेत्रात आपली प्रगती होईल. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक दुधारी अस्त्र आहे. कारण ज्या अल्गोरिदमचा वापर करून तुम्ही युद्धात उतरले आहात, त्याला शत्रूचे प्रोफेशनल हॅकर्स आणि एक्सपर्टस् चुकवू किंवा चकवूही (डिसिव्ह अँड मिसलीड) शकतात.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)

[email protected]