
स्वातंत्र्योत्तर काळातील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार, ज्यांच्या लेखनाचे गारुड वर्षानुवर्षे समाजमनावर आहे असे साहित्यिक म्हणजे जी. ए. कुलकर्णी. जीएंच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून कणकवली येथील ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांनी त्यांच्या निलायम संस्थेमार्फत जी. ए. कुलकर्णी शताब्दी संस्मरण कार्यक्रमांतर्गत अभिवाचन जागर करायचे ठरवले आहे. त्यानुसार जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रत्येक महिन्याला तीन अभिवाचक जीएंच्या तीन कथांचे अभिवाचन करणार आहेत.
10 जुलै रोजी जीएंच्या जन्मदिनी या उपक्रमाची सुरुवात झाली, तर येत्या 11 डिसेंबर रोजी जीएंच्या पुण्यतिथीला अभिवाचन जागर उपक्रमाची सांगता होणार आहे. याअंतर्गत कणकवली, कुडाळ आणि तळेरे येथे एका महिन्यात तीन कार्यक्रम होणार आहेत. कणकवली येथे निलायमतर्फे, कुडाळ येथे बाबा वर्दम थिएटरतर्फे आणि तळेरे येथे संवाद परिवाराततर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने एक वेगळा प्रयोग करण्यात आला. कथा वाचली जात असताना चित्रांचे रेखाटन करण्यात आले.
‘शताब्दी स्मरण’ उपक्रमात…
जीएंच्या ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘पिंगळावेळ’, ‘सांजशकुन’, ‘रमलखुणा’, ‘रक्तचंदन’, ‘काजळमाया’, ‘निळासावळा’, ‘डोहकाळिमा’ या नऊ कथासंग्रहांतील प्रत्येकी दोन कथा सादर होतील. एकूण 18 कथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 18 अभिवाचक सादर करतील. कणकवलीत वर्षा सामंत, अंजली मुतालिवक, वामन पंडित यांनी अभिवाचन केले. त्यांनी आपल्या दर्जेदार सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.






























































