गडचिरोलीत अतिवृष्टी, 250 ते 300 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गोसीखुर्द आणि चिचडोह धरणाचे पाणी वैनगंगा नदीत वेगाने प्रवाहित होत असल्याने पैनगंगा नदीच्या उपनद्या उलट प्रवाही झाल्या आहेत. याशिवाय नागपूर वेधशाळेने रविवारी देखील जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील वैनगंगा -कठाणी -खोब्रागडी -दिना- प्राणहिता यासह पाल नदीने पात्र सोडले असून यामुळे कित्येक हेक्‍टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. सलग पाचव्या दिवशी अतिदुर्गम भामरागड तालुका पर्लकोटा नदीच्या पुराने वेढला असून, या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारी शहराची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली.

या शहरात सुमारे 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, 250 ते 300 गावं संपर्कविहीन झाली आहेत.या सर्व गावांच्या स्थानिक प्रशासनाशी जिल्हा मुख्यालय संपर्क राखून आहे. आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान गणेश विसर्जनाचे दिवस असल्याने गणेशभक्तांनी नदीपात्रात खोल जाऊ नये, असेदेखील प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात पुरामुळे 3 मृत्यू ओढवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या