संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाची साठवण क्षमता 126.15 मीटर असून आजची पाणीपातळी 121.20 मीटर एवढी असून 05 सेंमी उंचावरून पाणी वाहत आहे. तर विसर्ग 41.92 घनमीटर/ सेकंद आहे . सध्या धरणात एकूण 64.88 दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा 64.56 दलघमी एवढा आहे. गडनदी धरणातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गडनदी प्रकल्प कुचांबे उपविभागाचे उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी दिली.

शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वतः सह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. धरणात पूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ते पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून 11 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 50 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण 575 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गडनदी धरण पहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरु नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये. नाकरीकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या