नाशिकचे रांगडे सौंदर्य

>> विशाल देवकर

इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा आणि अनेक दुर्गअवशेषांनी नटलेला सर्वांगसुंदर किल्ले गाळणा.

56 किल्ल्यांनी व्यापलेला नाशिक जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यांचं नंदनवनच होय! इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा आणि अनेक दुर्गअवशेषांनी नटलेला सर्वांगसुंदर किल्ले गाळणा या सगळ्यांना अपवाद ठरावा याच पठडीतला आहे. शासनाच्या वतीने नुकतीच किल्ल्यावर केलेल्या डागडुजीमुळे अलीकडच्या काळातच हा किल्ला बांधला असावा असा प्रथमदर्शनी भास होतो.

या किल्ल्यास एकच मार्ग असून एका पाठोपाठ उभारण्यात आलेली अजस्र दरवाज्यांची मालिका किल्ल्याच्या संरक्षणात अधिक भर घालते. एका दरवाज्यातून दुसऱया दरवाजापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱयाच्या टप्यात येत असून शत्रू अलगद टिपला जाईल अशी व्यवस्था केल्यामुळे किल्ल्यांची अभेद्यता लक्षात येते. किल्ल्याला भेट देण्यासाठी धुळे किंवा मालेगाव गाठून इथून पुढे डोंगराळे-गाळणा गावाकडे जाणाऱया गाडीमार्गाने आपण थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहचतो. किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी नाथपंथीय गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर असून ते फारच सुंदर व प्रशस्त आहे. तिथून पश्चिम दिशेने किल्ल्याकडे जाणारी वाट आपल्याला थेट गडाच्या पहिल्या परकोट दरवाज्यात येऊन जाते. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस दगडात कमळपुष्प कोरलेली असून याच्या दोन्ही बाजूस पहारेकऱयांच्या देवडय़ा आहेत. यानंतर किल्ल्याचा दुसऱया लोखंडी दरवाजासमोर येऊन पोहोचतो. याच्या माथ्यावरील मधल्या चर्येत एक पर्शियन लिपीतील शिलालेख आपणास पाहावयास मिळतो. यानंतर पुढे गडाचा तिसरा दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या उजव्या हाताला गडाचा लांबच लांब पसरलेला तट पाहताना आपणास गाळणा किल्ल्याची भव्यता अनुभवता येते. आपण हा तट पाहून पायऱयांच्या वाटेने गडाच्या चौथ्या लाखा दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या उजव्या हाताला असणाऱया तटातील महिरपी कमान आपल्याला राजस्थानातील गडकिल्ल्यांची आठवण करून देते.

या दरवाज्याच्या कमानीच्या माथ्यावर दोन सुंदर दगडी कमळे कोरलेली असून या प्रवेशद्वाराच्या पहारेकऱयांच्या देवडय़ा लाकडापासून अतिशय सुंदररीत्या नव्याने बांधल्या आहेत. इथून पुढे उजवीकडे वळल्यावर आपणास तटबंदीत बांधलेले दोन सज्जे पाहायला मिळतात. यापैकी पहिला सज्जा नक्षीदार स्तंभावर उभा असून येथून गड पायथ्याचे गाव व परिसर न्याहाळता येतो. या सज्जाशेजारीच एक कोठी असून या कोठीपुढेच दुसरा सज्जा आहे. त्याच्या माथ्यावर नक्षीदार घुमटी आहे. हे कलापूर्ण दोन सज्जे पाहून गडाचा तट उजव्या हातास ठेवत पुढे गेल्यावर डावीकडील कातळात एकामागोमाग एक खोदलेल्या पाच गुहा आहेत. यापैकी तिसऱया गुहेत मारुतीची मूर्ती आहे. यातील काही खोलगट गुहा पाण्याने भरलेल्या तर काही कोरडय़ाच आहेत. आल्यावाटेने परत माघारी येऊन इथून पुढे पायऱयाने गडमाथा गाठायचा. इथे आपल्याला उजव्या हाताला एक सुंदर महिरपी कमान पाहायला मिळते. येथून पुढे गेल्यास एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी 15व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इ.स. 1526 मध्ये नगरचा बादशाहा बुरहान निजामशहाने या किल्ल्यावर आक्रमण करून हे मंदिर जमीनदोस्त केले व या ठिकाणी सध्याची भव्य मशीद उभी केली. हा महत्त्वपूर्ण उल्लेख ‘बुरहाने मासीन’ या ग्रंथात नमूद केले आहे.

इथून पुढे गेल्यावर आपण अंबरखान्याच्या भग्न वास्तू, आणि सदरेची वास्तू नजरेस पडते. इथून पुढे गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजाकडे गेल्यास या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन शरभांची शिल्पे कोरली आहे. या बुरुजाच्या माथ्यावरून खाली पाहिल्यावर गडाचा पूर्व बाजूचा तिहेरी कोट व त्याच्यामध्ये एकाखाली एक या पद्धतीने खोदलेली पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. गाळणा किल्ल्याच्या दर्शनीपूर्व बाजूसच भक्कम बांधकाम करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गडाच्या पूर्व उतारावर असणारे डोंगराचे कंगोरे. या कंगोऱयांच्या मदतीने शत्रू सहजपणे वर येऊ शकत असल्यामुळे या बाजूला लांबच लांब तटबंदी व बुरुज बांधण्यात आले आहेत. गाळणा किल्ल्याच्या माथ्यावरील सर्वोच्च पठारावर चार थडगी वगळता कोणतेही अवशेष नाही. पण येथील थडग्यांवरील बारीक नक्षीकामाची कलाकुसर पाहता ही थडगी राजपरिवारातील सदस्यांची असणार याची आपणास खात्री पटते.गाळणा किल्ल्यावरील अतिशय सुंदर बांधणीचे जलसंकुल हे या किल्ल्याचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू तिच्या आतमध्ये बाराही महिने थंडगार पाणी वाहणारा झरा आणि या झऱयाचे पाणी साठविण्यासाठी आतमध्ये दगडी कुंडही बांधले आहे. या झऱयाचे पाणी जिवंत राहण्यासाठी या वास्तूच्या माथ्यावर गडनिर्मात्याने छप्पर बांधलेले नसावे. इथे आपली गडफेरी पूर्ण होते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या