
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढली होती. ऑगस्ट महिन्यात या साथीच्या आजारांची संख्या वाढली असताना गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मात्र आजाराचे प्रमाण कमालीचे घटले आहे. त्यामुळे भाविकांना बाप्पा पावला, अशी भावना मुंबईकर व्यक्त करत आहेत.
मुंबईत दर पावसाळ्यात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असतात. ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 736, स्वाईन फ्लूचे 183, डेंग्यूचे 147 रुग्ण आढळले होते. मात्र, लाडक्या बाप्पाचे आगमन होताच साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत घट झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान मलेरियाचे 89, डेंग्यूचे 29 व स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळल्याने ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत घट झाली आहे. 1 ते 28 ऑगस्ट दरम्यान मलेरियाचे 736, स्वाईन फ्लूचे 183 , डेंग्यूचे 147 तर लेप्टोचे 61 रुग्ण आढळले होते. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण संख्येत झपाटय़ाने घट झाल्याने सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1 ते 4 सप्टेंबर दरम्यानची आकडेवारी
मलेरिया 89
डेंग्यू 29
गॅस्ट्रो 38
लेप्टो 6
कावीळ 4
स्वाईन फ्लू 3
चिकनगुनिया 1
1 ते 28 ऑगस्ट दरम्यानची आकडेवारी
मलेरिया 736
स्वाईन फ्लू 183
डेंग्यू 147
लेप्टो 61
गॅस्ट्रो 444
कावीळ 51
चिकनगुनिया 3
खोकताना किंवा शिंकतान तोंडावर रुमाल ठेवणे, स्वच्छ हात धुवावे, डोळे, नाक व तोंडाला हात धुतल्याशिवाय स्पर्श करू नये, गर्दीत जाणे टाळावे व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

























































