
काँग्रेसचे थिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अथवा नाही याबाबत तूर्तास भाष्य करणे टाळले आहे. येत्या 3 आठवड्यात सगळं चित्र स्पष्ट होईल, तेव्हाच मी तुम्हाला याबाबत उत्तरे देऊ शकेल असे थरूर यांनी म्हटले आहे. मी ही निवडणूक लढवणार आहे अथवा नाही याबाबत मी आताच काही बोलणार नाही असे थरूर म्हणाले. लोकशाही मानणाऱ्या पक्षात अशा पद्धतीच्या निवडणुका ही चांगली बाब असल्याचेही ते म्हणाले .
थरूर यांनी म्हटलंय की, गांधी कुटुंबातील कोणीही व्यक्ती अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असे या कुटुंबाने आधीच स्पष्ट केले आहे. गांधी कुटु्ंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष होत असेल तर ती चांगली बाब असेल असे थरूर यांचे म्हणणे आहे. गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या निवडणुकीत खरोखर उतरली नाही तर शशी थरूर ही निवडणूक लढवतील असे सांगितले जात असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. गांधी कुटुंबातील कोणी व्यक्ती निवडणुकीत उतरली नाही तर त्यांच्यावतीने अशोक गेहलोत हे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


























































