गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफ करण्यात येत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून टोलमाफी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबईतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यात दाखल होत असतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्यामुळे अनेक भाविक मुंबई, पुणे, कोल्हापूर या मार्गे कोकणात जातात. या मार्गावर अनेक टोल नाके आहेत. हे लक्षात घेऊन गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने टोलमाफीची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांचे निवेदन चौधरी यांनी पत्रासोबत जोडले आहे.