प्रॉमिसिंग – प्रत्येक माध्यम महत्त्वाचं!

>> गणेश आचवल

सध्या रंगभूमीवर ‘चारचौघी’ हे नाटक खूप गाजत आहे. तीन दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर आलेल्या नाटकाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या नाटकात ‘प्रकाश’ ही व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार म्हणजे श्रेयस राजे… एक प्रॉमिसिंग चेहरा.

श्रेयसला अभिनयाची आवड लहानपणापासून होती. त्याच्या आई-वडिलांनी कायम त्याला प्रोत्साहन दिलं. शाळेत असताना राजू तुलालवार यांच्या बालनाटय़ातूनदेखील त्याने काम केलं होतं. एकांकिका आणि नाटक या आवडी जपल्या जाव्यात, या हेतूने श्रेयसने ‘जोशी बेडेकर कॉलेज’ला कला शाखेत प्रवेश घेतला आणि सातत्याने तो आयएनटी, मृगजळ अशा विविध एकांकिका स्पर्धातून भाग घेऊ लागला. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात श्रेयसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे सुवर्णपदक सलग तीन वर्षे मिळालं होतं. ‘अलगद’, ‘ओश्तोरीज’, ‘अॅनास्थेशिया’ अशा अनेक एकांकिकातून त्याने भूमिका केल्या. ‘इप्टा’ या बहुचर्चित हिंदी एकांकिका स्पर्धेत ‘जुम्मेबाज’ या एकांकिकेसाठी श्रेयसला अतिशय प्रतिष्ठत अशी ‘बलराज सहानी ट्रॉफी’ मिळाली होती.
‘चारचौघी’ या नाटकातील त्याच्या अनुभवाविषयी श्रेयस सांगतो, ‘एकदा अचानक मला दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा पह्न आला आणि त्यांनी माझं ‘जिगरबाज’मधील काम बघितल्याचं सांगितलं. आपण नाटक करत आहोत, तुला काम करायला आवडेल का? असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी विचारल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता. आपण स्पीच आणि टेक्स्टवर उत्तम काम करू, असे त्यांनी मला सांगितले आणि मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मी लगेच होकार दिला आणि मग मला जेव्हा नाटकातील ‘चारचौघी’ कोण आहेत ते कळलं, तेव्हा हे नाटक माझ्या आयुष्यात एक वेगळं वळण आणणार, याची जाणीव झाली. ‘जिगीषा’सारख्या निर्मिती संस्थेशी त्या निमित्ताने जोडला गेलो. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाच्या प्रोसेसमधून, नाटकाच्या तालमीतून खूप काही शिकत होतो, अजूनही शिकतोय. नाटकाचं नाव जरी ‘चारचौघी’ असलं तरी त्यातील पुरुष व्यक्तिरेखासुद्धा प्रशांत दळवी यांनी ज्या प्रकारे लिहिल्या आहेत, त्या व्यक्तिरेखांचं नाटकातील स्थानही जाणवलं. नाटकाच्या प्रयोगांनंतर लोक आवर्जून भेटून प्रतिक्रिया देतात, तेव्हा खूप समाधान मिळतं. कारण नाटक हे माझं पहिलं प्रेम होतं आणि कायमच असेल.’

कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरुवातीला टीव्ही मालिकांत काम करावं का याबाबत श्रेयस थोडा साशंक होता, पण माध्यम कोणतंही असेल तरी अभिनय ही आवड जपली जाणं आणि आपण वैविध्यपूर्ण भूमिकां साकारून लोकांपर्यंत पोचणं यासाठी टीव्ही मालिका हे माध्यमसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे त्याने जाणलं. ‘प्रीती परी तुजवरती’, ‘भेटीलागी जिवा’, ‘मोलकरीण बाई’, ‘जिगरबाज’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘ती परत आलीये’ अशा अनेक मालिकांत त्याने केलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये सुद्धा श्रेयसची भूमिका होती. ‘भेटीलागी जिवा’मध्ये तर त्याने स्वत चाळीस भारुडे सादर केली होती.