
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
अष्टविनायकांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात त्याच्या आराध्यदैवताचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. गजाननाच्या साजिऱ्या रूपाचा हा सोहळा साजरा करताना गणेशाचं गणनायक हे रूप जास्त लुभावणारं. वेदव्यासांच्या लेखणीतले आणि लोककलेतील पूर्णत भिन्न रूप असणारा गणपती म्हणूनच ओमस्वरूपही आहे आणि गणनायक आहे.
विद्येची आणि कलेची देवता असणारा श्री गणेश म्हणजे जननायक, गणनायक. गणेशोत्सव म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि जगातील काही भागांत गणेशोत्सव मोठय़ा आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात अष्टविनायकांची मोठी परंपरा आहे आणि गाणपत्य संप्रदाय हा स्वतंत्र संप्रदाय म्हणून संपूर्ण भारतात मान्यता पावलेला आहे. महाराष्ट्रातील महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या संप्रदायांनीदेखील श्री गणेशाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
वेद व्यासांना महाभारताची ऊर्जा साक्षात भगवान गणेशाने दिली आहे. वारकरी संप्रदायात गणेशाचे महत्त्व सर्व संतांनी अधोरेखित केले असून वारकरी संप्रदायातील संकीर्तन प्रकार कीर्तन, लळित, भजन, भारूड यांनी भगवान गणेशाला प्रारंभीच वंदनीय मानले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील भगवान गणेशाचे संकीर्तन हा चिंतनाचा विषय झाला आहे. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग। होय अंग हरी रूप।’ कीर्तनाने देह हरिरूप होतो असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. कीर्तन हा नवविधा भक्तीतील महत्त्वाचा प्रकार आहे. संतांच्या अभंगावर कीर्तनामध्ये निरूपण होते. गणेशोत्सवात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रंजनपर कार्यक्रमांच्या ऐवजी कीर्तन महोत्सव आयोजित केले जातात आणि या कीर्तन महोत्सवांमध्ये गणेशाच्या जन्माची कथा सादर केली जाते. तसेच त्याने सिंदूर राक्षसाच्या केलेल्या वधाची कथा सादर केली जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यासह अनेक संतांनी आपल्या अभंग रचनांच्या पूर्वी भगवान गणेशाचा धावा केलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ‘ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।’ अशा मंगल चरणाने सुरुवात केलेली आहे. संत नामदेव महाराजांनीदेखील मंगल चरणामध्ये गणेशाचे वंदन केले आहे. हे वंदन असे –
‘प्रथम नमन करू गणनाथा। उमा शंकराचिया सुता। चरणावरी ठेवूनि माथा।
साष्टांग आता दंडवत।।1।।
दुसरी वंदू सारजा। जे चतुराननाची आत्मजा। वाकसिद्धी पाविजे सहजा।
तिच्या चरण वोजा दंडवत ।।2।।’
संत नामदेव महाराज गणेशाला
वंदन करतात ते असे…
‘प्रथम नमूं गजवदनु। गौरिहराचा नंदनु। सकळ सुरवारांचा वंदनु।
मूषक वाहनू नमियेला।।1।।
त्रिपुरा वधी गणाधिपति। हरे पूजिला भावे भक्ती। एके बाणे त्रिपुर पाडिला क्षिती।
ते पशुपति संतोषला।।2।।’
अष्टलोकपालांनीदेखील गणेशाची पूजा केली असे संत नामदेवराय या अभंगात पुढे म्हणतात. एकूणच रिद्धीसिद्धी, सारजा आणि गणेशाचे नर्तन याचे वर्णन ठायी ठायी संतांच्या अभंगात येते.
वारकरी संतांच्या अभंगांमध्ये गणपती, रिद्धीसिद्धी, सरस्वती यांची वर्णने हमखास येतात. एवढेच नव्हे तर कीर्तन आणि सदृश्य सोंगी, भारूड सोंगी, भजन, लळित या वारकरी संप्रदायाच्या संकीर्तन प्रकारांमध्ये वर्णन आणि प्रत्यक्ष दर्शन या देवतांच्या सोंगाच्या रूपाने होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सोंगी भारुडे, सोंगी भजने आणि लळिते प्रसिद्ध आहेत. त्यातील गणेशाचे दर्शन मोठे मनमोहक असते.
लळित – लळित हे सांगतेचे भक्तिनाटय़ आहे. कीर्तन ज्या संप्रदायाचे, त्या संप्रदायाच्या प्रभावाखाली लळित सादर होत असे. आजही ते त्याच पद्धतीने सादर होते. वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली असणाऱया लळिताच्या प्रारंभी ‘रूप पाहता लोचनी’ हा ध्यानाचा अभंग तसेच ‘सुंदर ते ध्यान। उभे विटेवरी’ हा रूपाचा अभंग म्हटला जातो. ‘विठ्ठल विठ्ठल’ अशा गजरात सोंगाचे आगमन आणि निर्गमन होत राहते. लळिताचे पहिले सोंग निघण्याची तयारी होते तेव्हा मंगल चरण आणि प्रसादाचा अभंग म्हटला जातो.
‘देवा प्रसाद देई झडकरी।। सद्गुरू देवा प्रसाद देई।। धृ. ।। वासुदेव दंडीगाण।। प्रसाद मागू आले दान।। आणिक आले कोण कोण।। नावे त्यांची परसावी।।1 ।। ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वाणी।। मागू आल्या चारी खाणी।।2।। गोंधळ, डफकर, भैरव, जोगी।। बाळसंतोष आणि वैरागी ।। फकीर डाकुलता तो योगी।। कानफाटा आला तो ।।3।। आंधळा, पांगुळ, बहिरा, मुका।। कैके, सबरी, मुंडा देखा।। भाट किन्नर ज्योतिष ऐका।। तिष्ठताती प्रसादा। ।।4।। सारे मंडपी आले असे।। राव विनोदे बोलतसे।। महार जोहार करीतसे।। प्रसाद द्या द्या म्हणवूनी ।।स. ।।5।। ऐसे अपार भक्त आले।। प्रसाद देऊनी तृप्त केले।। श्रमदासाची पाऊले ।। यदुवीर दासे वंदिली।। 6।।’
प्रसादाचा हा अभंग संपल्यानंतर ‘रात्र थोडी सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे लळितात रात्रभर सोंगे सुरू राहतात आणि प्रत्येक सेंगाचा प्रहर, काळ ठरलेला असतो.
‘गणराया लवकर येई। भेटी सकळांशी देई। नाचत आले हो गणपती। पायी घागुऱया वाजती ।।’
हा संत तुकाराम महाराजांचा अभंग भजनी मंडळी सुरू करतात आणि गणपतीचे पहिले सोंग येते. त्यानंतर रिद्धीसिद्धी, सरस्वती ही सोंगे येतात. सूत्रधार, वनमाळी ही सोंगे येतात. वनमाळी हे पात्र दशावतारातील संकासुर अथवा भागवत-मेळा-यक्षगानातील विदूषक या पात्रासारखे असते. निरर्थक ग्राम्य बडबड करणारे हे पात्र वरवर पाहता केवळ विनोद निर्मिती करणारे पात्र असे वाटत असले तरी ते भावबळे देव बद्ध करणाऱया, नाम संकीर्तन भक्ती साधणाऱया भाविक, लौकिक पातळीवरील एक सश्रद्ध पात्र अथवा सोंग असते.
भारुडातील गण ः भारूड या भक्तिनाटय़ाचा प्रारंभ मुळात गणेश स्तवनाने होतो. ‘विठ्ठल, गणपती दुजा नाही’ ही संतांची भावना भक्तांमध्येही अवतरलेली असते. लालबाग, परळ, माझगाव, भायखळा या परिसरामध्ये एकेकाळी भारुडी भजन मंडळी होती. काळभैरव प्रासादिक भारूड भजन मंडळ, संत ज्ञानेश्वर प्रासादिक भारूड भजन मंडळ अशी मंडळे प्रामुख्याने पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरू नगर तालुक्यांतील भारूड मंडळे भारूड सादर करायचे. त्यात गणपती, रिद्धीसिद्धी यांची सोंगे हमखास असायची.
भारुडातील गण असा…
‘तुज नमो नमो ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा नमो नमो
ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुज नमो’
मुख्य गायक गळ्यात टाळ अडकवून उंच उडय़ा घेत ओमकाराचे असे संकीर्तन करतो तेव्हा गणपती, रिद्धीसिद्धी ही पात्रे भारुडात येतात. दशावतार, भारूड, लळित ही तिन्ही भक्तिनाटय़े. त्यामुळे या भक्तिनाटय़ांमध्ये गणपती, रिद्धीसिद्धीचे सोंग हमखास असते.
दशावतार – सिंधुदुर्ग जिह्यात दशावताराची परंपरा असून या दशावतारात पूर्वरंगात गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती ही पात्रे येतात आणि गणपतीची षोडशोपचारे पूजा केल्याचा अभिनय भटजी नावाचे पात्र करते. एकूणच गणपती हा खरा लोकनायक आहे.
गणपतीचे वेदव्यासांच्या लेखणीतले रूप आणि लोककलेतील रूप पूर्णत भिन्न आहे. जसं भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहे आणि लोकसखाही आहे तसाच गणपती ओमस्वरूप ही आहे आणि गणनायक आहे.
(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत.)