
सामना ऑनलाईन | प्रतिनिधी
‘आय ऍम हिअर’ ऍपचे लवकर लाँचिंग
शाडूच्या मातीपासून सुबक, अत्यंत आकर्षक गणेशमूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांच्या शोधात गणेशभक्त असतात. गणेशोत्सवाचे वेध लागले की, भक्तांची धावपळ होते. सध्याच्या डिजिटल युगात हातातील मोबाईल फोनवर क्लिक करून हे काम सोपं झाले तर, असा विचार मनात येतो ना… त्यासाठीच गणेश मूर्तिकारांचे ‘आय ऍम हिअर’ हे ऍप लवकर लाँच होणार आहे. या ऍपमधून आपल्याला हव्या त्या मूर्ती बघता येतील आणि त्यांचे बुकींग करता येईल. मंगलमूर्ती डॉट कॉम हा उपक्रम राबवणार आहे.
आर्थिक चणचणीमुळे, योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक गुणी मूर्तिकार वंचित राहतात. त्यांची कला खऱ्या अर्थाने समाजापुढे येत नाही. त्यासाठीच मुलुंडच्या महेश कदम आणि त्यांच्या युवा टीमने मंगलमूर्ती डॉट कॉम ही वेबसाईट काही वर्षांपूर्वी सुरू केली. आतापर्यंत चार हजारांहून अधिक मूर्तीकार या वेबसाईटशी जोडले गेले आहेत. आता त्याहीपुढे जाऊन मूर्तिकारांसाठी गुगल अँड्राइड ऑप्लिकेशन तयार केले आहे. ऍपसाठी सध्या मूर्तिकारांची नोंदणी सुरू आहे. 1 जूनला ऍपचे उद्घाटन होईल.





























































