मूर्खानी एफएसआय वाढवून नवी मुंबईची वाट लावली, या नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका! गणेश नाईक यांचा रोख नेमका कुणावर

मूर्ख लोकांनी एफएसआय वाढवल्यामुळे नवी मुंबई शहराची पुरती वाट लागली आहे. नगरविकास खात्याने मंजूर केलेला सर्वच एफएसआय जर वापरला गेला तर शहरात चालण्यासाठी एकावर एक तीन माणसे रचावी लागतील. शहरात गाड्या आणता येणार नाहीत. जर याच मनोवृत्तीच्या लोकांच्या हाती महापालिकेची सत्ता गेली तर शहराचे वाटोळे होणार आहे. त्यामुळे या नालायकांना सत्तेपासून लांब ठेवा, असा घणाघात वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी येथे केला.

माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी आयोजित केलेल्या सेवाभावी उपक्रमाचा पंधरवडा समारोप सोहळा बुधवारी संध्याकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गणेश नाईक पुन्हा एकदा आपल्या सत्तेतील सहकाऱ्यांवर जोरदार घसरले आहेत. वाटेल ते झाले तरी चालेल, पण पैसा आपल्याकडेच आला पाहिजे अशा मनोवृत्तीचे हे लोक आहेत, त्यामुळे त्यांना सत्तेपासून लांब ठेवा, असे गणेश नाईक यावेळी म्हणाले.

८० टक्के कामे जनता दरबारात मार्गी लागतात

पुढील जनता दरबार येत्या सोमवारी ठाणे शहरातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार हे हक्काचे ठिकाण आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ८० टक्के कामे ऑन दी स्पॉट मार्गी लावली जातात, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट करून जनता दरबार सुरूच राहणार याचे संकेत दिले आहेत.