नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झालीय! गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना टोला

नेहमीच फार्महाऊसवर रमणारे निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत आले असून मतदारांकडे मताची भीक मागत आहेत. त्यांच्या पार्टीचा पैसा हा हरामाचा आहे आणि तोच वाटायला आता सुरुवात झाली आहे. तुमच्याकडे मते मागायला येताना त्यांची नजर तुमच्या नजरेला भिडणार नाही. कारण चोरांची नजर कधीच वर होत नाही, ती नेहमी खालीच असते, असा जबरदस्त टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

भाजप आणि शिंदे गट सत्तेत सहभागी असले तरी नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेला हा वाद आता महापालिका निवडणुकीत अत्यंत टोकाला गेला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी तुर्भे स्टोअर्स परिसरात भाजप उमेदवारांची जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे यांना जोरदार लक्ष्य केले.

शिंदे गटातील बहुतेक जण हे नवी मुंबईऐवजी फार्महाऊसवर अधिक काळ रमलेले असतात. आता निवडणूक जाहीर झाल्यांनतर ते शहरात आले आहेत. त्यांच्या पार्टीचा पैसा हा हरामाचा आहे. याच पैशाचा जोरदार उतमात आता निवडणुकीत होणार आहे. फार्महाऊसवर रमणारे आता मत मागत फिरत असले तरी त्यांची तुमच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत होणार नाही. कारण जो चोर आहे, तो कधीच आपल्या नजरेला नजर मिळवत नाही. चोराची नजर ही नेहमी खालीच असते. तशीच अवस्था या फार्महाऊसवाल्यांची झाली आहे. कोणी कितीही दावे केले तरी ते फोल ठरणार आहेत. असेही गणेश नाईक यावेळी म्हणाले.