भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन, गणेश नाईकांची टीका

भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ”. ‘भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेपण बेपत्ता करेन”, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे.

नवी मुंबईत एकमेकांविरोधात लढणारे भाजप व शिंदे गट सध्या एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. गणेश नाईक यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना त्यांनी शिंदेवर निशाणा साधला. ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय नेतृत्वाने रोखले आहे म्हणून शांत आहे. जर त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखविले असते, असा दावाही नाईक यांनी यावेळी केला. तसेच गेल्या पाच वर्षात नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही नाईक म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी नवी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी नवी मुंबई बाहेरून चांगली आणि आतून खराब अशी टीका केली होती. त्यावर बोलताना गुरुवारी नाईक यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलेला. नवी मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत? नगर विकास खात्याचे मंत्री कोण आहेत? नवी मुंबईच्या विकासाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच नवी मुंबई आतून खराब आहे असे म्हणतात. हे म्हणजे बापाने माझे अपत्य चोर आहे असे म्हणण्यासारखे आहे. शासकीय कारभारात चाललेल्या उधळपट्टीवर मी गेल्या चार वर्षांपूर्वीच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या कालावधीत झालेल्या सर्वच कामांचा हिशेब मागणार आहे. कोणत्या मूर्ख माणसाने हा युडीसीआर आणला आहे हेच कळत नाही. या एफएसआयचा अतिरेकी वापर होत असल्यामुळे नवी मुंबई शहर हे वास्तव्य करण्याजोगे राहणार नाही. सिडकोमध्ये आणि शासनामध्ये बिल्डरांचे दलाल बसले आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील घराची किंमत ७२ लाख रुपये ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असेही जोरदार फटकारे गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लगावले होते.