
मुंबईसह उपनगराला गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारीही सर्वत्र चांगला पाऊस झाला. मुंबईची लाईफलाईन सुरळीत सुरू असली तरीही अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. सात दिवसांच्या गणपतींना निरोप देताना मुसळधार पावसात गणेशभक्तांची प्रचंड तारांबळ उडाली. मात्र उत्साह कायम होता. गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. रात्री 9 वाजेपर्यंत 10072 गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आज सातव्या दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. पुढचे दोन दिवस मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुजरातपासून दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हा पाऊस पडतो आहे. आज रविवारी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तर पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव, मालाडपासून पुढे वसई, विरार आणि नालासोपाऱयातही मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुंबईत नुसताच ढगांचा गडगडाट सुरू होता तर अधूनमधून पावसाची एखादी जोरदार सर येऊन जात होती.
रात्री 9 पर्यंतचे विसर्जन
सार्वजनिक- 348
घरगुती- 9576
गौरी- 148
एकूण- 10072
कृत्रिम तलावांत
सार्वजनिक -24
घरगुती -1499
गौरी -28
एकूण -1551
पाऊस (मि.मी.)
कुलाबा -5.6 मि.मी.
सांताक्रुझ -21.3 मि.मी.
























































