गणपती बाप्पा मोरया… आता बिनधास्त या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गणरायाच्या कृपेने अखेर गणपती मंडपांवरील परवानगीचे विघ्न आज टळले. गणेशोत्सव मंडळांना आता तातडीने मंडप परवानगी मिळणार आहे. पोलीस आणि एक महापालिकेचा एकेक अधिकारी त्यासाठी विभागनिहाय नेमला गेला आहे. मुंबई पोलीस आयुक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर अनेक मंडळांनी श्रीफळ वाढवून ‘गणपत्ती बाप्पा मोरया, आता बिनधास्त या!’ असे म्हणत आपले मंडप पुन्हा चढवण्यास सुरुवात केली. परवानगीचे विघ्न टळल्याने गणेशोत्सव यंदाही दणक्यातच साजरा होणार आहे.

गणेशोत्सव समन्वय समितीची यासंदर्भात आज पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली. त्यात मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष, शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, माजी नगरसेवक अशोक पटेल आदी उपस्थित होते. मंडप परवानगी व अन्य मुद्दय़ांवर सखोल चर्चा झाल्यानंतर मंडपांना परवानगी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गणपती मंडळांनी पालिकेशी त्वरित संपर्प साधून परवानग्या घ्याव्यात असे आवाहन या बैठकीनंतर समितीच्या वतीने विनोद घोसाळकर यांनी केले.

मंडपांसाठी परवानगी देण्यास महापालिकेने यंदा ‘एक खिडकी’ योजना सुरू केली. तीन दिवसांत परवानगी मिळणार होती. पण बहुतांश मंडळांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. अशा अर्ज केलेल्या मंडळांनी संपर्प साधल्यास त्यांना तातडीने परवानगी दिली जाईल.

स्पीकर ‘लाऊड’, ट्रफिक ‘जॅम’ नको

मंडपांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि लाऊडस्पीकरचा आवाज या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि लाऊडस्पीकरही मर्यादित आवाजात वेळेत सुरू करावेत अशा सूचना पोलिसांनी केल्या.

अंधेरी ते दहिसर मेट्रोचे बॅरिकेड्स आत सरकणार,गणेशोत्सवापूर्वी रस्ते मोकळे करणार

अंधेरी ते दहिसर दरम्यान मोठय़ा प्रमाणावर मेट्रो रेल्वेची कामे सुरू असली तरी गणेशोत्सवापूर्वी या सर्व ठिकाणी मेट्रोचे बॅरिकेड्स आत ढकलून मिरवणुकांसाठी जागा मोकळी करून दिली जाणार आहे. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांना मेट्रोच्या अधिकाऱयांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अंधेरीपासून ते दहिसरपर्यंतचे मेट्रोचे अडथळे दूर होणार आहेत.

गेल्या 6 जुलै रोजी समन्वय समितीची पालिका प्रशासनाबरोबर बैठक झाली होती. ऑनलाईन अर्ज केल्यास तीन दिवसांत परवानगी देण्याचे पालिकेने त्या बैठकीत मान्य केले होते.

त्यानंतर बहुतांश मंडळांनी अर्ज केले. मात्र त्यातील अनेकांना अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. दरम्यानच्या काळात गिरगावातील काही जुन्या मंडळांनी मंडप उभारले होते. पण पालिकेने ते अनधिकृत ठरवून तोडून टाकले होते. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मुद्यावरून गणेश मंडळांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक बोलावून त्यांनी मार्गदर्शनही केले होते.