
सामना ऑनलाईन, मुंबई
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. बाजार फुलले आहेत. मूर्तीशाळा गजबजल्या आहेत. रोषणाई, डेकोरेशनची लगबग सुरू आहे. भाविकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. पण विघ्नहर्त्याच्या उत्सवापूर्वी ‘विघ्न’ आलेय ते महागाईचे. आरास आणि सजावटीच्या सामानासह बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठsसाठी लागणारे पूजेचे साहित्य आणि प्रसादही महागला आहे. बाप्पासाठी लागणाऱया प्रत्येक वस्तूची किंमत दुपटी-तिपटीने महागली आहे. बाप्पा रे… काय ही महागाई! अशीच प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटली आहे.
आधीच महागाई, त्यातच साहित्य आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने दुकानदारही ग्राहकांना दुपटीपेक्षा जास्त दर आकारत आहेत. गणेशोत्सवासाठी लागणारी प्रत्येक वस्तू घ्यावीशी वाटतेय. पण त्यांचे दर पाहताच ग्राहक पुढच्या दुकानाकडे वळत आहेत. बजेट पुरत नसल्याने सजावटीलाही थोडा आवर घातला जात आहे. रेडिमेड सजावटीपेक्षा घरच्या घरीच थोडक्यात सजावट करण्याचा निर्णय या महागाईमुळे घ्यावा लागत असल्याचे सांगत ग्राहक बाप्पाची माफी मागताना दिसत आहेत. महागाईमुळे गणेश मंडळांचे बजेटही कोलमडले आहे. छोटय़ा मंडळांना यंदा आपल्या वर्गणीत वाढ करावी लागली आहे.
महागाई वाढतेय, पण पगार काही वाढत नाही. आमच्या घरी दहा दिवसांचे गणपती असतात. पूजेच्या साहित्यापासून डेकोरेशन, लायटिंग अशा सगळ्याच गोष्टींत भरमसाट वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गॅस यांचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आमचे संपूर्ण बजेटच कोलमडले आहे- दीपिका दळवी, पनवेल
आमचा गणपती गावी असतो. सजावटीसाठी मुंबईत अनेक व्हरायची मिळतात. त्यामुळे दरवर्षी आम्ही इथूनच सर्व सामान घेऊन जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक गोष्टीत 15 ते 20 टक्के भाववाढ दिसत आहे. पण काहीही झाले तरी बाप्पाचा उत्सव दणक्यातच साजरा करावा लागणार- दिनेश फडके,मीरा रोड
थर्माकोल बंदीमुळे सजावटीसाठी आवश्यक असणाऱया इकोफ्रेंडली वस्तूंचे भाव वाढले आहेत. कारागीरांची वाढती मजुरी, पेट्रोल-डिझेलमुळे वाढलेला वाहतूक खर्च, इकोफ्रेंडली मखरासाठी लागणारा अधिक वेळ त्यामुळे इकोफ्रेंडली मखरांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे- अरुण दरेकर, अक्षय डेकोरेटर्स
- थर्माकोल बंदीमुळे इकोफ्रेंडली वस्तूंची मागणी वाढली
- कागद, पुठ्ठा आदींपासून बनवलेल्या मखरांची किंमत 2 हजारांवर
- स्क्वेअर टिकली, वेलवेट टिकली, लायक्रा, कोरिया टिकली, डिझायनर लटकन आदी प्रकारच्या पडद्यांच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ
- विविधरंगी प्लॅस्टिक फुलांच्या किमतीही दुप्पट
- फुलांच्या किमतीही दुपटीने वाढण्याची शक्यता, मोगरा जाणार 600 रुपये किलोवर
लाडू कडाडला, फुटाणेही शंभरीपार
बाप्पाच्या आवडीचा लाडूही यंदा कडाडला आहे. कडक बुंदीच्या लाडूंचा दर 130 रुपयांवरून 160 रुपये किलोंवर पोहोचला आहे. गतवर्षी 100 रुपये किलो असणारे साखरफुटाणे यंदा 120 रुपये किलो झाले आहेत. धुपाचा भाव 300 रुपयांपासून 600 रुपये पाव किलोवर पोहोचला आहे. तितक्याच कापरासाठी 300 रुपये मोजावे लागत आहेत.
जीएसटी आणि सातत्याने होणारी इंधन दरवाढ यामुळे बाप्पाच्या आगमनात हे महागाईचे विघ्न उभे राहिले आहे. गणेशमूर्त्यांपासून अगदी उत्तरपूजेपर्यंत लागणाऱया प्रत्येक वस्तूच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे.























































