गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 44 अतिरिक्त विशेष गाड्या; दिवा-चिपळूण-दिवा मेमूच्या आणखी 2 सेवा चालवणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष 250 गणपती ट्रेनव्यतिरिक्त आणखी 44 विशेष ट्रेन चालवणार आहे. तसेच दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात 296 विशेष ट्रेन गणेशभक्तांच्या सेवेत धावणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेनच्या एपूण 8 सेवा चालविण्यात येणार आहेत. ही ट्रेन 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर व 7 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. या गाडीच्या 4 सेवा चालविण्यात येतील. ही गाडी परतीच्या प्रवासात 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून रात्री 11.20 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणाऱ्या या गाडीचे आरक्षण 3 ऑगस्टपासून होईल.

अनारक्षित विशेष गाडय़ांचा विस्तार

ट्रेन क्रमांक 01155/01156 दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या 2 अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 01155 दिवा-चिपळूण विशेष ट्रेनची 1 फेरी आणि 01156 चिपळूण-दिवा विशेष ट्रेनची 1 फेरी वाढवली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या 38 अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता 40 अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान चालवण्यात येईल.

दिवा-खेड-दिवा मेमूच्या 36 सेवा

दिवा-खेड-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाडय़ांच्या 36 सेवा चालविण्यात येतील. ही मेमू विशेष ट्रेन 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत दिवा येथून दररोज दुपारी 1.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता खेड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष ट्रेन 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत खेड येथून दररोज सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता दिवा येथे पोहोचेल.