बाप्पाचा आवडता मोदक महागला; गणरायासाठी कायपण, होऊ द्या खर्च… महागाई वाढली तरी बेहत्तर! उत्साहाला उधाण!!

बाप्पाचा आवडता मोदक बनवण्यासाठी लागणारे नारळ, पीठ, गूळ, चारोळ्या आणि वेलचीची दरवाढ झाल्याने मोदक महागला आहे. यातच गणेशोत्सवात सजावटीचे साहित्यही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून झेंडूसह सर्वच फुले, तयार प्रसाद, मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. बहुतांशी कडधान्याच्या दरांत 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याने ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांना ‘महागाईची फोडणी’ पडली आहे. असे असले तरी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव ‘होऊ दे खर्च’ असे म्हणत दणक्यातच साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

गणेशोत्सव उद्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या वर्षी सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे गणेशोत्सव जोरदारपणे साजरा करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असतानाच बाजारपेठाही गर्दी आणि गणेशोत्सव साहित्याने फुलल्या आहेत.

मूर्तींच्या किमतीही महागल्या

गृहोपयोगी वस्तूंच्या किमती वाढल्या असताना बाप्पाच्या मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत. उत्पादन खर्च, कामगारांची वाढलेली मजुरी आणि रंगाच्या किमतीही वाढल्याने मूर्तीची किंमत वाढल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. तर मूर्तीच्या किमती वाढल्याने आर्थिक भार वाढल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.

अशी झाली दरवाढ

चणाडाळ 100 रुपये किलो, गूळ 80, तूरडाळ 160, मुगडाळ 130, मसूर 100, तेल 140 रुपये, साखर 46, शेंगदाणा 140, नारळ 40 रुपये…खोबरे 200 वरून 400, आक्रोड 1400 वरून 2000, चारोळी 800 वरून 3000, वेलची 3600 वरून 4000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.