
>>डॉ. मुकुंद कुळे
गणरायाचं थाटामाटात आगमन झालं, त्याची प्रतिष्ठापना झाली; तरी घरोघरच्या मायबाईला खरी ओढ असते ती गौराईच्या येण्याची. वर्षभर ही पोर कुठे नजरेला पडत नाही. तिची ख्याली-खुशाली कळत नाही. त्यामुळे माहेरवासाला हक्काने येण्याचे तिचे दिवस जवळ आले की, मायबाईचा जीव थाऱ्यावर राहात नाही. लेकीसाठी कायकाय करता येईल, याचे मनसुबे रचण्यातच तिचा सारा वेळ निघून जातो. लेकीच्या वाटेवर तिचे डोळे खिळून राहतात. गणपतीच्या आगमनानंतर तर मायबाय हळवी होते. कधी एकदा गौराय येते आणि तिला डोळं भरून पाहते, असं मायबाईला होऊन जातं. पण नेहमीच ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी गौराय येतेच असं नाही. कधी चौथ्या, तर कधी पाचव्या दिवशीही येते. मग मात्र मायबाईच्या जिवाची होणारी उलाघाल पाहण्यासारखी असते. तिचा जीव घरात ठरतच नाही तो! सारखी आत-बाहेर, आत-बाहेर करत राहते. तिचं हे अस्वस्थपण घरच्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि मग ती उगाचच सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होते. पण मायलेकीच्या नात्यातलं गुंतलेपण त्यांना काय ठाऊक? शेवटी दोघींचे सुख-दुःखाचे कोपरे सारखेच असतात. नि ओढ काय फक्त मायबाईलाच लागलेली नसते. लेकही तिकडे दिवस मोजतच असते…
गणपतीच्या आगमनाच्या पाठोपाठ धीर न धरवल्यासारखी गौरबाय धावत येते माहेरच्या अंगणात! येताना येते ती लक्ष्मीच्या पावलांनी. माहेरचं घर-दार उजळून टाकण्यासाठी. पण माहेरी येण्यासाठी तिला किती अन् काय सोसावं लागतं, ते तिचं तिलाच ठाऊक. खरं तर कुठलाही सणवार आला की, आजूबाजूच्या सया लगेच निघून जातात माहेरी. गौरबाय-पार्वती मात्र कायम सासरीच कामाला जुंपलेली. माहेरी जायचं नुस्तं नाव काढण्याची खोटी की सासरच्या मंडळींची कामाची हे जंत्री तयारच. सासू नाहीच, पण नवराही तिला सहजासहजी सोडायला तयार होत नाही. गणपतीपाठोपाठ श्रावण-भाद्रपदात तरी तीन दिवस जाता यावं, म्हणून मग गौराय पार ज्येष्ठातच नवऱयाच्या खनपटीला बसते आणि माहेरी जायला रजा द्या म्हणते. पण मोठय़ा हौसेने तिनेच निवडलेला तिचा नवरा तरी कसला तर्कट नि हेकट. तो गौराईला कामालाच लावतो. गौराई म्हणजे पार्वती आणि तिचा नवरा म्हणजेच, महादेवात ज्येष्ठापासून सुरू झालेला हा झगडा लोकरहाटीतल्या आयाबायांनी संवादगीताच्या माध्यमातून चांगलाच रंगवला आहे-
देवा ईश्वरा द्या मला रजा,
जायाला माझ्या माहेरा हो
एवढा डोंगर साफ कर पार्वती,
मग जा तू तुझ्या माहेरा गं
एवढा डोंगर साफ केला देवा,
जाते मी माझ्या माहेरा हो
एवढी पेरणी कर गं पार्वती,
मग जा तुझ्या माहेरा गं
पण महादेव कसला खटय़ाळ. एवढी विनवणी करूनसुद्धा तो गौराईला सोडत नाही. तिच्याकडून निंदणी-खुरपणी अशी सगळी कामं करून घेतो. ही सगळी कामं गौराई गपगुमान करते. तिने पेरलेलं बी रुजतं, वाढतं. शिवार डोलायला लागतं. संपली एकदाची शेतीची कामं म्हणत गौराई परत माहेरी जायची परवानगी मागते. पण गौराईला सोडायला महादेव राजी होत नाही तो नाहीच. आता मात्र गौराईचा धीर सुटतो. ती फणकारते, रागावते. मग थोडं नमतं घेऊन महादेव तिला राजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तिला लालूचही दाखवतो-
सोन्याचं सुपलं घेईन पार्वती,
नको जाऊ तू तुझ्या माहेरा गं…
पण पार्वतीला कसलं आलंय सोन्याच्या सुपाचं कवतिक? सोन्यासारखं माहेर सोडून ती या स्मशानजोग्याच्या मागे आलेली. तिला नाहीच पडत भूल सोन्याच्या सुपाच़ी ती म्हणते-
सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधु,
जाते मी माझ्या माहेरा हो…
आणि येतेच निघून थेट माहेरी. सासरच्यांनी सोबत काही नाही दिलं, तरी तिला फरक पडत नाही. कारण आपल्या माहेरी आपलं कौतुक होणार याची तिला खात्रीच असते. तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मायबायला तिच्या आगमनाची खूण मिळते. ती तिला दारातच उभी करते. लगबगीने घरात जाते. घरातला भाकर-तुकडा तिच्यावरून ओवाळून टाकते. तांब्यातल्या पाण्याने तिचे पाय धुते, अल्लद कुशीत घेतल्यासारखं करते आणि घरात आणते. मग कितीतरी वेळ निशब्दताच असते. मायलेकींचा शब्दाविनाच संवाद सुरू असतो. आंजारणं-गोंजाणं, पापण्यांच्या कडा ओल्या होणं आणि एकमेकींना गळामिठी घालत राहणं. न बोलताही सारं सारं एकमेकींना कळत असतं. गौराईची मूकवेदना न सांगताच मायबाईला कळते. तिचं हुर्द आभाळाएवढं होतं. आपल्या आभाळाएवढय़ा पंखाखाली ती लेकीला घेते. उगीउगी म्हणत थोपटत राहते. कळतं मायबाईला नवऱयाबरोबरच सासूनेही केलेला लेकीचा जाच. नवरा माहेरी जायची परवानगी देत नाही म्हणून सासुबाईंना विचारायला जावं, तर त्यांनीच उलट आणखी कामाला लावलेलं.
कारल्याचं आळं लाव गं पार्वती,
मग जा तू तुपल्या माहेरा…
…आणि अशा पद्धतीनं कारल्याचा वेल लावून तो वाढून त्याची भाजीही खाऊन झाली, तरी लेकीला माहेरी यायची न मिळालेली परवानगी. एवढंच कशाला एक दिवस गौराईला उठायला उशीर झाला, तर सासुबाईंनी केवढा त्याचा गहजब केला. खरंतर रात्री कामामुळेच झोपायला झाला होता उशीर. तेव्हा गौराईला पहाटेच्या गार वाऱयात लागली निद्रा. पण सासूने नेलं तिच्या नवऱ्याजवळ गाऱ्हाणं. मग चिडलेल्या त्याने काय करावं?
तोडला जी चिंचेचा फोक
त्या फोकाने मार त्याने दिला वो
असं काय काय समजून-उमजून आल्यावर मायबाईच्या जिवाचं पाणीपाणी होतं. लेकीसाठी काय करू नि काय नको, असं तिला होऊन जातं. सगळ्यात आधी ती गौरायला न्हाऊ-माखू घालते. गौरायचे लांबसडक केस आपल्या हाताने उजवते-धुपवते. नंतर आपल्या नव्या लुगडय़ाची घडी मोडायला देते. आपले दागिने तिच्या अंगावर घालते. हातात तोडे-पाटल्या-बांगडय़ा-पिछोडी, दंडात बाजुबंद, गळ्यात ठुशी-वज्रटीक-मोहनमाळ-बोरमाळ-सरी असं काय काय. त्याशिवाय यंदाच्या सणाला खास तिच्यासाठीच केलेला नवा साजही चढवते तिच्या अंगावर.
गौराई बावरूनच जाते या कोडकौतुकाने. तिला ठाऊक असतं, आपल्या मायबाईचं हळवं मन. म्हणूनच अनेक गोष्टी ती उघडही करत नाही. आपल्याला यायला उशीर का झाला तेही सांगत नाही मायबायला. उगाचंच काहीतरी इकडचं तिकडचं सांगत बसते.
प्रत्यक्षात मात्र काय काय दिव्य पार पाडायला लागलेलं असतं, ते फक्त तिचं तिलाच ठाऊक असतं. पण सांगितलं नाही किंवा कितीही लपवलं, तरी कळायचं ते कळतंच मायबाईला. शेवटी गौराय तिच्याच जिवाचा तर गोळा. त्याच्या संवेदना का कळल्याशिवाय राहणार आहेत? मग मायबाय रात्री कुशीत घेऊन झोपते लेकीला. मनात मात्र दुसऱया दिवशी लेकीला काय काय खाऊ घालायचं याचेच बेत. त्यातच रात्र सरते. पहाट होते आणि मायबाई कामाला जुंपून घेते. गौराई झोपून उठेपर्यंत मायबाईचा पुरणा-वरणाचा, एकवीस भाज्यांचा स्वयंपाक पूर्णही होतो. एवढंच नाही, गौराईला सामिष भोजन करायचं असेल, तर त्याचीही तयारी केली जाते. अगदी करंदी भरलेल्या सरंग्यांपासून खिम्याच्या करंज्यांपर्यंत आणि बोंबलाच्या पोपटापासून ते खेकडय़ाच्या कालवणापर्यंत. फक्त लेकीने पोटभर जेवावं आणि तृप्त व्हावं, एवढीच मायबाईची अपेक्षा असते.
एवढी पक्वान्नं केल्यावर गौराईची अख्खी दुपार जेवणातच सरते. हे खाऊ की ते खाऊ असं तिला होतं. खरं तर जेवणापेक्षा ते मायबाईने खास आपल्यासाठी रांधलंय, याचंच तिला कौतुक असतं. मायबाई. प्रत्येक पदार्थ आपल्या हाताने भरवते. गौरायही हक्काने कोडकौतुक करवून घेते. अगदी मनापासून जेवते. गप्पा मारायला बसल्या बसल्या गौराई पेंगायला लागते. पण मायबाई तिला उठवत नाही, झोपू दे म्हणते. कारण रात्र जागवायची असते.
एव्हाना गौराई आल्याची खबर कानोकानी तिच्या सयांपर्यंत गेलेली असते. बघता बघता गौराईकडे माहेरवाशिणींची दाटी होते. झिम्मा-फुगडय़ा, दिंडे मोडण्यापासून चवळ्या खुटण्यापर्यंतचे सारे नाच होतात. गौराई देहभान विसरून नाचत असते, गात असते. सगळ्या सयांबरोबर खेळताना-नाचताना त्यांचं हसणं-खिदळणंही सुरू असतं आणि अचानक गाडी नवरोबांकडे वळते. आधीच गौराईच्या तालेवार नवऱयाचं सगळ्याजणींना कौतुक असतं. पण तो तिरशिंगराव असल्याचंही त्यांना ठाऊक असतं. म्हणूनच मग त्याच्याशी कसं जमवून घेतेस गं, असं सयांनी विचारल्यावर गौराय काही क्षण कावरीबावरी होते. पण लगेच आपण त्याला कसे पुरून उरतो, त्याचा त्यांना दाखलाही देते. निमित्त असतं लटक्या भांडणाचं. पण शंकर काहीबाही संशयानं विचारत राहतो आणि मग त्याची ही राणीदेखील त्याच्या शब्दाला जसंच्या तसंच उत्तर देते-
भली भली ग पारबती
शब्दाला उतार (उत्तर) देती
ऐकावं महादेवा शब्दाचा उतार घ्यावा…
गौराय-म्हादेवाचा हा लाडाचा झगडा ऐकून सगळय़ा सया भरून पावतात. जोडा असावा तर असा, असंच त्यांच्या मनात येतं आणि पुन्हा सगळय़ा जणी फेर धरतात. त्या फेरात मध्यभागी गौराय पुन्हा विजेसारखी तळपू लागते. तिची अलवार पावलं तालावर थिरकू लागतात. जणू वर्षभराची ऊर्जाच उरात भरून घेत असावी. न जाणो, सासरी गेल्यावर पुन्हा खेळायला-नाचायला मिळेल न मिळेल!
घराच्या एका कोपऱ्यातच उभं राहून मायबाई शांतपणे लेकीचं हे घरभर वावरणं बघत असते. तिच्या समाधानानंच आपलं घर भरलंय याची तिला जाणीव असते. एका डोळय़ात हसू नि एका डोळय़ात आसू ठेवून ती लेकीचं सुख मनात साठवत असते. मात्र, आता नाचतेय उद्या एव्हाना गेली पण असेल असं मनात येतं नि मायबाईचा जीव थरारतो. तसंच होतं… गौराईला जागवता जागवता पहाट कधी होते तेही कळत नाही. तिसरा दिवस उजाडतो आणि गौराईच्या पाठवणीची तयारी सुरू होते. घरातल्या कुणाचंच लक्ष थाऱ्यावर नसतं. गौराई आली काय नि चालली काय, असंच साऱ्यांना वाटत असतं. तिने अजून थोडे दिवस राहावं असंच साऱ्यांना वाटत असतं. पण शेवटी ती गौराईच असते. तिलाही आपल्या मान-मर्यादेचं भान असतंच. कितीही राहावंसं वाटलं तरी ती एक दिवस अधिकचा राहत नाही; कारण तिला माहेर नि सासर दोन्हीकडची गोडी टिकवायची असते. सांधणं हा तिने आपला मनोधर्म मानलेला असतो. म्हणूनच कितीही आग्रह झाला तरी ती आपल्या मनाचा निग्रह सोडत नाही. मायबाईलाही कळत असतं, शेवटी आपलीच लेक आहे. म्हणूनच तीही मग आग्रह करत नाही. हात हातात घेऊन स्पर्शातून फक्त एवढाच दिलासा देते- मी आहे तुझ्यासाठी. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते… असंच जणू तिला सुचवायचं असतं.
…आणि गौराई आल्यासारखी चालू पडते.
गणेशोत्सवात ती येऊन गेल्यावर प्रश्न पडतो- कोण आलं होतं नेमकं, गौराई की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक?
– [email protected]





























































