गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना खूशखबर! तुतारी आणि मडगाव एसी डबलडेकरच्या डब्यांत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेने चाकरमान्यांना खूशखबर दिली आहे. दादर-सावंतवाडी रोड ‘तुतारी एक्प्रेस’चे डबे 15 वरून 19 आणि मडगाव एसी डबलडेकरचे डबे 11 वरून 18 करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे.

कोकण रेल्वेने गणपतीच्या सणासाठी होणारी गर्दी पाहता तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. 11003/11004 दादर-सावंतवाडी रोड ‘तुतारी एक्प्रेस’ला यापूर्वी असलेले 15 डब्यांऐवजी आता 19 डबे जोडण्यात आले आहे. ‘तुतारी एक्प्रेस’च्या डब्यांच्या स्थितीत 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019पर्यंत हा बदल राहणार आहे. ट्रेन क्र. 11085/11086 आणि ट्रेन क्र. 11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबलडेकर एक्प्रेसला 11 डब्यांऐवजी आता 18 डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसी डबलडेकरच्या डब्यांच्या रचनेत 24 ते 26 ऑगस्टपासून हा बदल केला असून तो 10 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

कोचुवेली एक्प्रेसला एलएचबी डबे

ट्रेन क्र. 22113/22114 एलएलटी-कोचुवेली एक्प्रेसला आता कायमस्वरूपी आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात आल्याने ती 23 डब्यांवरून 22 डब्यांची होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तुतारीला जादा डबे जोडण्याची अनेक वर्षांची मागणी होती, परंतु या गाडीला पॅण्ट्री कारचा डबा जोडायला हवा होता. तुतारीचे जनरलचे डबे वाढले असले तरी या गाडीची प्रतीक्षा यादी कमी होणार नसल्याचे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.