कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या देखाव्याने सरकारचा तिळपापड

हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आली असून विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका व प्रसारमाध्यमे या चारही प्रमुख स्तंभांना सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीला बांधले आहे, असा देखावा कल्याणच्या विजय तरुण मंडळाने गणेशोत्सवात उभारला आहे. त्यामुळे सरकारचा तिळपापड झाला असून पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाच नोटीस बजावली आहे.

विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका व प्रसारमाध्यम या लोकशाहीच्या चारही  प्रमुख  स्तंभांना सरकारने सत्तेच्या खुर्चीत बांधले असून हिंदुस्थानात लोकशाही धोक्यात आली असल्याचा अहवाल स्वीडनमधील ‘वी-डेम इन्स्टिटय़ूट’ने दिला आहे. त्यावर आधारित भव्य, आकर्षक देखावा कल्याणच्या विजय तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात साकारला आहे. त्यामुळे सरकारचा भयंकर तिळपापड झाला आहे. हिंदुस्थानात लोकशाही धोक्यात आली असल्याचा संदेशच या देखाव्यातून देण्यात आला असून केवळ कल्याणच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकशाहीचे सध्याचे भयाण वास्तव सजावटीतून मांडणाऱया विजय तरुण मंडळाला पोलिसांनी हा देखावा हटवावा, अशी नोटीस बजावली आहे. एवढेच नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करणाऱया विजय तरुण मंडळाला टार्गेट केल्याने मिंधे सरकारविरोधात  गणेशभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 60वे वर्ष आहे. दरवर्षी येथे हटके सजावट असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. राष्ट्रप्रेम, देशभक्ती, समाजसेवा, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर केलेली सजावट नेहमी आकर्षक ठरत असते. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख व विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी ‘हिंदुस्थानातील लोकशाही’ या विषयावर भव्यदिव्य तसेच जळजळीत अंजन घालणारा वास्तववादी देखावा उभारण्यात आला आहे. मात्र या देखाव्यामुळे सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण होईल, असा जावईशोध मिंधे सरकारच्या पोलिसांनी  लावला असून विजय साळवी यांना कलम-149 अन्वये नोटीस धाडण्यात आली आहे.

स्वीडनमधील ‘वी-डेम इन्स्टिटय़ूट’ या नामांकित संस्थेने संपूर्ण देशातील लोकशाहीबाबत सर्वेक्षण केले. त्यातून आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून हिंदुस्थानची ओळख असली तरी हीच लोकशाही सध्या धोक्यात आली असल्याचे अनुमान या अहवालात काढले आहे. भाजपचे सरकार लोकशाही दाबून टाकत असून हुकूमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे. तर विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे या चार खांबांनाच कसे दबावतंत्र वापरून दावणीला बांधले जात आहे यावरदेखील भाष्य केले आहे. या अहवालावर आधारितच प्रबोधन करणारा देखावा विजय तरुण मंडळाने गणेशोत्सवात साकारला. पण हा देखावा मिंधे सरकारच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे.

हे देवा… आम्ही हतबल झालो आहोत!

विजय तरुण मंडळाच्या देखाव्यात देशातील लोकशाहीचे खरे चित्र मांडणारे निवेदन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘हे देवा… आम्ही हतबल झालो आहोत. या लोकशाही प्रधान राष्ट्राचे भवितव्य तुझ्याच हातात आहे, तुच आम्हास आशीर्वाद दे, या हुकूमशाही कार्यप्रणालीशी लढण्याची शक्ती दे. हे गणराया, आपल्या आदर्शवत राष्ट्राच्या परंपरेचे रक्षण कर. आपली आदर्शवत राज्यघटना अबाधित राहू दे… आपली आदर्शवत लोकशाही मजबूत, ताकदीने या देशावर कार्यरत राहू दे…’ अशा शब्दांत विघ्नहर्त्या गणेशालाच साकडे घालण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोर्टाने दिली होती चपराक

मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसून काहींनी सत्तेच्या लालसापोटी मिंधे गटाची कास धरली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या फोडाफोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यावर आधारित विजय तरुण मंडळाने गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात अंगार चेतवणारा देखावा उभारला होता. त्यात निष्ठावंतांचे झाड दाखवले गेले. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशा स्वरुपाच्या या देखाव्याची सर्वत्र चर्चा झाली. पण पोलिसांनी नोटीस बजावली आणि देखावा बंद करण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांच्या आडून धमक्या देणाऱया मिंधे सरकारच्या विरोधात विजय तरुण मंडळाने थेट कोर्टात धाव घेतली. सर्व परिस्थितीचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला सणसणीत चपराक मारली व देखावा उभारण्यास परवानगी दिली. आता या वर्षी पुन्हा सरकारने पोलिसांच्या आडून विजय तरुण मंडळाला नोटीस बजावली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य़ आहे की नाही?

गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधनाचे काम करीत आहोत. यंदाच्या देखाव्याची माहिती दोन आठवडय़ांपूर्वीच पोलिसांना दिली होती. तरीही मंडळाला नोटीस पाठवली. सध्याचे भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत असून हिंदुस्थानातील लोकशाहीच दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र याद राखा… या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून त्याचा आम्ही पुरेपूर वापर करणारच –विजय साळवी विश्वस्त व प्रमुख सल्लागार, विजय तरुण मंडळ

पोलीस म्हणतात, हे करू नका… ते करू नका

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्होनमाने यांनी विजय तरुण मंडळाला पाठवलेल्या नोटिशीत ‘हे करू नका – ते करू नका’ असे फुकाचे सल्ले दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडपात कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह देखावा, चलचित्र, ध्वनिफित लावण्यात येऊ नये. देखाव्यात या बाबी प्राथमिक असतात. ध्वनिफीत, चलचित्र नसेल तर अशा देखाव्यांना अर्थच नसतो. पण पोलिसांनी मिंधे सरकारच्या आदेशानुसार विजय तरुण मंडळावर बंधने घातल्याने संताप व्यक्त होत आहे.