
श्रीगोंदा तालुक्यातील शेंडगे वस्ती येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
गोपीनाथ कळसिंग भोसले (वय 40, रा. शेंडगेवाडी, ता. श्रीगोंदा), प्रवीण कळसिंग भोसले (वय 30), रवि नंदू पवार (वय 21, दोघे रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा), रामदास अशोक काळे (वय 20), राजेश अशोक काळे (दोघे रा. रांजणगाव, ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन चंदर भोसले
(रा. शेंडगे वस्ती, खरातवाडी, ता. श्रीगोंदा) व भोल्या दुबळ्या भोसले (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) हे फरार झाले आहेत.
बेलवंडी बुद्रूक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी खरातवाडी, शेंडगे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास गुन्हेगारांची शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी शेंडगे वस्ती परिसरातील बाजरीच्या शेतात काहीजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेले असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाव घेऊन वरील पाचजणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन कटावणी, एक क्रू ड्रायव्हर, दोन पाने, दोन दुचाकी हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरोपींवर यापूर्वी श्रीगोंदा, बेलवंडी, पारनेर, कोतवाली, शिक्रापूर या पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाच्या गुह्यांची नोंद आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, हवालदार ज्ञानेश्वर पठारे, पवार, भांडवलकर, शिंदे व कर्जत उपविभाग नेमणूक सहायक फौजदार ढवळे यांनी ही कारवाई केली आहे.

































































