
सामना प्रतिनिधी, मुंबई
जामीन मिळालेल्या आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे कोर्टात जामीनदार हजर करून त्यांची सुटका करणारी आठ जणांची टोळी गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. गोवंडी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या या टोळीने बोगस जामीनदार हजर करून शहरातील न्यायालयांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळींकडून विविध कंपन्यांच्या नावाने बनलेली ओळखपत्रे, पगाराची स्लिप आदी महत्त्वाची बनावट कागदपत्रे व अन्य साहित्य जप्त केले आहे.
शिवाजीनगर परिसरात राहणारी आठ जणांची टोळी आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनदार मिळवून देत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट-1 ला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खेडेकर, एपीआय पवार, ठाकूर, महिला उपनिरीक्षक चिंचोलकर, मोरे, विजय पाटील, संदीप पाटील, मुठे आदींच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. ती टोळी 25 तारखेला सत्र न्यायालयाच्या बाहेर येणार असल्याचे कळताच पथकाने न्यायालयाबाहेर सापळा रचून शाकिर हुसेन मेहंदी हसन खान (36), शफिक रफिक कुरेशी (34), फय्याज अमानउल्ला खान (34), इम्रान युसूफ सलमानी (27), मोहम्मद परवेज अब्दुल शेख (50), रियाज अहमद मुस्ताक अहमद पठाण (35), दाऊद काझी (38) आणि युसूफ रमजान खान (31) या आठ जणांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत जामीनदार हजर करण्यासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे सापडली. त्यांनी चेंबूर परिसरात एक खोली घेतली होती.
त्या खोलीत लॅपटॉप, स्कॅनर, पेनड्राइव्ह, रबरी शिक्के, शिधावाटप पत्रिका, शिधावाटप पत्रिकेचे बनावट कोरे फॉर्म, बोगस कंपन्यांचे बोगस ओळखपत्र, बोगस कंपन्यांच्या बोगस वेतन पावत्या, मार्पशिटच्या छायांकित प्रती, बोगस कंपन्यांचे लेटरहेड असा बनावट मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाण्याचे रबरी शिक्के
आरोपी अशिक्षित आहेत. काही जण रिक्षा चालवतात, तर काही जण बिगारी, इलेक्ट्रिशियनचे काम करतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू आहे. आरोपींनी पोलीस ठाण्यांचे, अधिकाऱयांच्या स्वाक्षरीचे बनावट रबरी स्टॅम्प बनवले होते.
परस्पर कागदपत्रे कोर्टात सादर
एखाद्या आरोपीला जामीन मंजूर झाला की ही टोळी त्या आरोपीच्या जामिनासाठी जामीनदाराची बनावट कागदपत्रे कोर्टात सादर करायचे. त्यानंतर कोर्टाने फिजिकल सर्टिफिकेटसाठी पोलीस ठाण्याला फॉर्म देण्यास सांगितल्यानंतर ही टोळी हॅण्ड डिलिव्हरी पोलीस ठाण्याला देतो असा बनाव रचून तो फॉर्म मिळवायचे. त्यानंतर पोलीस ठाण्याचा बनावट शिक्का व अधिकाऱयाची स्वाक्षरी करून तो फॉर्म कोर्टात सादर करायचे, असे दिलीप सावंत यांनी सांगितले.
summary- gang who made fake documents got arrested




























































