गंगाखेडात पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गंगाखेड

पीक विमा मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा मंगळवारी ऊद्रेक झाला. अर्ज स्विकारण्यासाठी आलेल्या रिलायंस प्रतिनिधीस तब्बल 3 तास पोलीस ठाण्यातच कोंडून ठेवण्यात आले. जि.प. सदस्य डॉ. सुभाष कदम, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबईतील वरीष्ठांशी केलेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच आपल्या तक्रारी दाखल केल्या. येत्या 20 तारखेच्या आत या तक्रारी निकाली काढण्यात येणार आहेत.

गंगाखेड तालुक्यांतील बहुसंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचीत आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पीक विमा अधिकारी जिल्हयात आले आहेत. पालम, गंगाखेड व सोनपेठ येथे हे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत आहेत. सोमवारी पालम येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतल्यानंतर रिलायंस प्रतिनिधी मंगळवारी गंगाखेड येथे आले होते. ते येणार असल्याची माहिती मिळाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या गंगाखेड शाखेत गर्दी केली होती. तक्रारी दाखल करत असताना रिलायन्सचे प्रतिनिधी कोणत्याही शेतकऱ्यास पोचपावती देत नव्हते. यावरून शेतकरी आणि प्रतिनिधी सौरभ बॅनर्जी यांच्यात बाचाबाची झाली. डॉ. सुभाष कदम आणि गोविंद यादव यांनी आग्रह धरल्यानंतरही पोचपावती देण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या बॅनर्जी यांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच बँकेत पोलिसांनी पाचारण करण्यात आले. यानंतरही शेतकरी आक्रमक होत असल्यामुळे बॅनर्जी यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी बॅनर्जी यांनी गाडीतून नेण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांना पायीच ठाण्यात जावे लागले.

पोलीस ठाण्यातही संतप्त शेतकरी ठाण मांडून बसले होते. डॉ सुभाष कदम, गोविंद यादव, रामजी सातपुते, सखाराम बोबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी रिलायंस कंपनीचे मुंबईतील हेड प्रकाश थॉमस यांचेशी चर्चा केली. यातून थॉमस यांनी आजच्या तक्रारी येत्या 20 तारखेपर्यंत निकाली काढू, शेतकऱ्यांशी मराठी अथवा हिंदीतून पत्रव्यवहार करू, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्टाफ वाढवू आदि बाबी मान्य केल्या. चर्चेदरम्यान अडीच ते तीन तास शेतकरी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठाण मांडून होते. तर बॅनर्जी यांना पोलीस संरक्षणात राठोड यांच्या दालनात बसवण्यात आले होते. यावेळी रामप्रभू मुंडे, बंडू शिंदे, दत्तराव भिसे, गोपीनाथ भोसले, भाऊसाहेब कुकडे आदिंची ऊपस्थिती होती. या बैठकीनंतर पोलीस ठाण्यातच शेतकऱ्यांच्या तक्रारी स्विकारण्यात आल्या. सायंकाळपर्यंत शेतकरी आपल्या तक्रारी दाखल करत होते. बँकांचे आयएफएससी कोड ऊपलब्ध करून देण्यासह अर्ज भरून देण्यासाठी डॉ. कदम, यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, बुधवारी 5 डिसेंबर रोजी सोनपेठ येथे शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. गंगाखेड तालुक्यांतील ऊर्वरीत शेतकऱ्यांनीही आपल्या तक्रारी तात्काळ दाखल कराव्यात, असे आवाहन डॉ. सुभाष कदम व गोविंद यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे.