
गंगाखेड तालुक्यातील मौजे झोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांनी बुधवारी रोजी घेण्यात येणारी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक अचानक रद्द केल्याने पालकवर्गांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुक्यातील मौजे झोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शालेय व्यवस्थापन समितीचे आयोजन करण्यात आले होते. तशा आशयाची लेखी सुचना देखील 26 ऑगस्ट रोजी पालकांना लेखी स्वरुपात देण्यात आली होती. परंतु आज सर्व पालक बैठकीसाठी शाळेत गेले असता मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांनी आज शाळा व्यवस्थापन समिती गठीत न करण्याचे सांगीतले. त्यामुळे संतप्त पालकांनी मुख्याध्यापकास याबाबत जाब विचारला असता मी मुख्याध्यापक आहे, मला जेव्हा बैठक घ्यायाची असेल तेव्हा घेईल. तुम्ही मला विचारणारे कोण? असे म्हणत पालकांना शाळेच्या आवातून पिटाळून लावले. मुख्याध्यापकाच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सर्वत्र चर्चा चर्चीली जात होती. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी पंचायत समिती कार्यालये गाठून गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांना लेखी निवेदन देऊन मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांना त्वरीत निलंबीत करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, दत्तराव आंधळे, दशरथ आंधळे, सुधाकर मुरकुटे, भास्कर मुंडे आदीं पालकांसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

































































