
गंगापूररोडवरील नरसिंहनगर येथे रविवारी सकाळी बिबटय़ा दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तीन तास धुमाकूळ घालणाऱया बिबटय़ाला वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत जेरबंद केले. दरम्यान, बिबटय़ाच्या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.
नरसिंहनगर येथे साडेआठ वाजता प्रथम रहिवाशांना बिबटय़ा दिसला. ही माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे पथकासह पोहचले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध मोहीम राबवण्यास सुरूवात केली. त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, संचारबंदी असतानाही नागरिकांनी गर्दी केल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत गेले.
इंजेक्शनने बेशुद्ध करून बिबटय़ाला पकडण्याचे प्रयत्न करताना त्याने झेप घेतल्याने भदाणे यांच्या पायाला जखम झाली. त्यानंतर धूम ठोकलेल्या बिबटय़ाला एका अपार्टमेंटजवळ इंजेक्शनने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले, तेव्हा तीन तासांचा हा थरार संपला आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

























































