गँगस्टर एजाज लकडावालाची मुलगी शुक्रवारी बनावट पासपोर्टच्या आधारे हिंदुस्थानबाहेर पळण्याच्या प्रयत्नात होती, पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच तिचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेऊन बेडय़ा ठोकल्या.
खार येथील एका बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तिच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान या गुह्यात एजाज लकडावाला याच्यासोबत त्याचा भाऊ अकिल याचाही सहभाग निश्चित झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अधिक तपास सुरू असताना असे समोर आले होते की, एजाज लकडावाला याची मुलगी सोनिया ही हिंदुस्थानात राहत असून तिने मुंबईत बनावट पासपोर्ट तयार करून घेतला आहे. त्यामुळे सोनियाविरोधात लूक आऊच सर्क्युलर जारी करण्यात आले होते. शुक्रवारी ती नेपाळला जाण्यासाठी तिच्या एक वर्षाच्या मुलीसोबत विमानतळावर आली असता तिला रोखून ठेवण्यात आले होते. मग तिला पुढील कारवाईसाठी खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले. सोनियाला आज कोर्टात हजर केले असता तिला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
वर्सोव्यातील शाहीदशी लग्न, 2018 साली पासपोर्ट
सोनियाने गेल्या वर्षी वर्सोवा येथे राहणाऱया शाहीद शेख याच्याशी लग्न केले. तसेच तिच्याकडे हिंदुस्थानचे बनावट पासपोर्ट मिळाले. हे पासपोर्ट तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या आधार, पॅनकार्ड, बँक खाते इत्यादींच्या आधारे मिळविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हिंदुस्थान पासपोर्ट कायद्यान्वये सोनियावर गुन्हा दाखल केला आहे.



























































