
पंजाबचा कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारच्या आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारच्या आई वडिलांना खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांप्रकरणी अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. गोल्डी ब्रारचे वडील शमशेर सिंह आणि आई प्रीतपाल कौर अशी आरोपींची नावे आहेत. श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात 2024 मध्ये नोंदवलेल्या एफआयआर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदेकरण येथील रहिवासी हरदेव सिंग यांचा मुलगा सतनाम सिंग यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 308(4), 351(1) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपी जोडप्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय-
उदेकरन गावातील रहिवासी असलेले तक्रारदार सतनाम सिंग हे गेल्या 33 वर्षांपासून शिक्षण विभागात कार्यरत आहेत. सतनाम सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांना एका परदेशी व्हॉट्सअॅप नंबरवरून फोन आला. बंबीहा ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. जर पैसे दिले नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला त्यांच्या कुटुंबाची आणि कोटकपुरा रोडवरील त्यांच्या घराची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला.
पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी त्याला आणखी तीन असेच धमकीचे फोन आले. या घटनेमुळे तो घाबरला होता. त्यामुळे या घटनेसंदर्भात कुटुंबाशी चर्चा करून तो आणि त्याचा भाऊ गुरसेवक सिंग सदर पोलीस ठाण्यात गेले. पीटीआयच्या वृत्तानुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच चौकशी सुरू झाली आणि गोल्डी ब्रारच्या आई वडिलांना अटक करण्यात आली.
























































