गद्दारांना कमी वेळात अमाप सत्तेचे बळ मिळाले! कल्याणचे भाजप आमदार गायकवाड यांचे मिंधेंना तडाखे

गद्दारांना कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचे बळ मिळाले आहे, असे जबरदस्त तडाखे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंध्यांना लगावले. आमदार गायकवाड यांनी सणसणीत ट्विट करून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या  मुजोर वक्तव्याचा खणखणीत समाचार घेतला.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील एकापाठोपाठ मिंधे गटावर हल्लाबोल करत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी आनंदोत्सव साजरा करताना आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून भाजपचा उमेदवार रिंगणात असेल, असा दावा केला होता. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंचा पत्ता कापणार की भाजप शिंदेंना कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी गणपत गायकवाड यांचे विधान मनोरंजनापुरते आहे, प्रसिद्धीसाठी आहे. अशा विदूषकांकडे लक्ष देऊ नका, असे वक्तव्य केले. यावर आज गणपत गायकवाड यांनी ट्विट करून श्रीकांत शिंदे यांचा  समाचार घेतला.   मिंधे गटाने शिवसेनेतून गद्दारी करून सत्ता मिळवली. त्या सत्तेच्या जोरावर मिंधेंची मनमानी सुरू आहे. त्यावरून गायकवाड यांनी तोफ डागली.

“ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा व सत्तेत बळ मिळाले आहे, त्यांना त्यांच्या नजरेला सर्वजण विदूषक आहेत असा भास होतो.” गणपत गायकवाड, आमदार, भाजप

मिंध्यांमध्ये चलबिचल

कल्याण, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी वारंवार शिंदे गटाचा जाहीर समाचार घेत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर उघड टीका करत आहेत. त्यामुळे शिंदे गटात चलबिचल आहे. श्रीकांत शिंदे यांना भाजप कार्यकर्त्यांचा टोकाचा विरोध असल्याने कल्याण लोकसभा भाजपला सोडावी लागेल किंवा शिंदे यांना भाजपच्या तिकिटावर उभे राहावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.