दर्शनमात्रे मनकामना पुरती

357

>> आशुतोष बापट

गणपतीला कुठल्याही भौगोलिक सीमांचे बंधन नाही. या सगळ्या सीमा ओलांडून ही देवता सर्वत्र लोकप्रिय झालेली दिसते. तो कधी नृत्यगणपती असतो, कधी उच्छिष्ट गणपती, तर कधी त्रिशुंड गणपती. रूपे भिन्न असली तरीही तत्त्व एकच… भक्तांचा सुखकर्ता.

आपल्या देशाचे सर्वात लाडके दैवत म्हणजे गणपती. ‘बाप्पा’ असे प्रेमळ नाव फक्त याच देवाला मिळालेले आहे. गणपतीइतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱया कुठल्या देवतेच्या वाटय़ाला आली असेल. अग्रपूजेचा मान प्राप्त झालेले गणपती हे दैवत प्रस्थापित सर्व देवांपेक्षा तरुण असूनसुद्धा लोकप्रियतेमध्ये सर्वांपेक्षा सरस ठरले आहे. गणपतीला कुठल्याही भौगोलिक सीमांचे बंधन नाही. या सगळ्या सीमा ओलांडून ही देवता सर्वत्र लोकप्रिय झालेली दिसते. तो कधी नृत्यगणपती असतो, कधी उच्छिष्ट गणपती, तर कधी त्रिशुंड गणपती. रूपे भिन्न असली तरीही तत्त्व एकच.. भक्तांचा सुखकर्ता.

गणपतीचे जन्मस्थान – दोडीताल

देवभूमी गढवाल म्हणजे भटक्यांचे नंदनवन. उंच उंच देवदार वृक्ष, गर्द हिरवी झाडी, पाठीमागे अनेक हिमाच्छादित शिखरे असे हे स्थान. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी विविध देवालये इथे हिमालयाच्या कुशीत वसलेली आहेत. समुद्रसपाटीपासून 10,757 फुटांवर असलेले दोडीताल हे त्यातलेच एक. गणपतीचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. पुराणात सांगितलेली गणेशजन्माची कथा इथेच घडल्याचे सांगितले जाते. महादेवाने गणपतीचे शिर उडवले आणि नंतर त्या जागी हत्तीचे शिर बसवले ही कथा याच ठिकाणी झाल्याचे समजले जाते. दोडीताल हे एक रम्य सरोवर आहे. याचे मूळ नाव ‘धुंडीताल’, जे गणपतीच्या नावावरूनच पडले आहे. उत्तरकाशी-संगमचट्टी-अगोडा-दोडीताल असा हा 22 किमीचा ट्रेक आहे. या ठिकाणी गणपतीचे मंदिर आणि आत गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. नयनरम्य गढवाल प्रांती असलेले हे गणेश जन्मस्थान पाहण्यासाठी 22 किमीची पायपीट करावी लागते. पण एक आगळेवेगळे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण निश्चितच भेट देण्यायोग्य आहे.

उच्ची पिल्लायार गणपती – तिरुचिरापल्ली

आपल्याकडे देव आणि त्यांच्यासंबंधीच्या दंतकथा विपुल प्रमाणात सापडतात. या गणपतीच्या बाबतीत असेच आहे. लंकाविजयानंतर रामचंद्रांनी बिभीषणाला एक विष्णुमूर्ती भेट दिली. बिभीषण हा असुर असल्यामुळे त्याने ती मूर्ती लंकेला नेऊ नये असे देवांना वाटले. देवांनी याबाबत विनायकाला विनंती केली. विनायक गुराख्याच्या वेषात गेला. बिभीषण स्नानाला गेला असताना ती विष्णुमूर्ती विनायकाने सांभाळायचे ठरले. ती मूर्ती जर जमिनीला टेकल्यास ती ती तिथेच राहील अशी अट असल्यामुळे विनायकाने ती मूर्ती मुद्दाम जमिनीवर टेकवली. बिभीषणाला हे समजल्यावर त्याने गुराख्याच्या मागे धावत त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर देवाने आपले खरे रूप प्रकट केले.  जमिनीवर टेकवलेली विष्णुमूर्ती कावेरी नदीच्या तीरावर श्रीरंगम इथे प्रस्थापित झाली, आणि डोंगरावर विनायकाचे मंदिर बांधले गेले. मूर्तीच्या कपाळावर आजही एक टेंगूळ पाहायला मिळते. पल्लव राजांनी हे मंदिर बांधायला घेतले पण नंतर विजयनगर साम्राज्याच्या, मदुराईच्या नायकांनी ते पूर्ण केले. तिरुचिरापल्ली इथे टेकडीवर असलेल्या प्रसिद्ध रॉकफोर्टमध्ये हे मंदिर आहे.

गणेश टोक – सिक्कीम

कांचनगंगा डोंगररांगेत वसलेले नितांत सुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. खरं तर इथे बौद्ध धर्माचे प्राबल्य असूनही एक सुंदर गणपती स्थान पाहायला मिळते. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून फक्त 6 कि.मी. अंतरावर नथुला खिंडीच्या रस्त्यावर समुद्रसपाटीपासून 6100 फूट उंचीवर हा गणपती वसला आहे. गर्भगृहात गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली आहे. इथून दिसणारा नजारा मात्र अफलातून आहे. गंगटोक शहर, राजभवन, आणि कांचनगंगा शिखराचा अप्रतिम देखावा इथून दिसतो. मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर रंगीबेरंगी पवित्र मानल्या गेलेल्या पताका लावलेल्या असतात. सिक्कीम भेटीत हे स्थळ न चुकता भेट द्यावे असेच आहे.

कंबोडियातील गणेश

कंबोडिया देशात सीएम रीप या शहराच्या ईशान्येला 140 कि.मी. अंतरावर, थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या डांगरेक डोंगररांगांमध्ये वसले आहे एक प्राचीन देवालय. जुलै 2008 मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. जवळजवळ 300 वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे इथे ख्मेर स्थापत्य शैलीच्या विविध अंगांचे दर्शन होते. इ.स.च्या 9व्या शतकात कंबोडियाचा सम्राट यशोवर्मन याने हे शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. शिखरावर वसती करणारा देव तो शिखरेश्वर असे सरळ सोपे नाव. राखाडी आणि पिवळ्या रंगाच्या वाळुकाश्मात (सँडस्टोन) या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. मुख्य मंदिरात आश्चर्य म्हणजे गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसते! कंबोडियन टोपीसारखा मुकुट असलेली गणपतीची मूर्ती अंदाजे दीड फूट उंचीची आहे. एका हातात बहुधा सुळा आणि दुसऱया हातात भांडं असून त्यावर सोंड टेकवलेली आहे. गणपतीचे कान त्याच्या खांद्याच्याही खालपर्यंत आलेले आहेत. या देवाच्या अफाट लोकप्रियतेला कुठल्याही सीमांचे बंधन राहिलेले नाही. प्राचीन इतिहासात डोकावले तर काही इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यावरसुद्धा गणेशाचे अंकन केलेले दिसून येते. अत्यंत लोकप्रिय आणि अतिशय लाडके असे दैवत असलेल्या गणेशाची रूपे खरं तर प्रचंड संख्येने आहेत. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह आहे. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नैराश्य पळून जाते आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ याची अनुभूती भक्तांना वारंवार येत असते.

 

आपली प्रतिक्रिया द्या