बाप्पाची भव्यता प्रत्यक्षात

42

 

सामना प्रतिनिधी । मुंबई

कलादिग्दर्शन करताना केवळ लोकांना सेट आवडेल एवढाच विचार करून चालत नाही, हिंदुस्थानी संस्कृतीचे जतन होईल यासाठीही काम करावं लागतं. तसं काम केलं तरच लोकांना तो सेट आवडतो, मनात भरतो, अशा शब्दात तरुण कला दिग्दर्शक सिद्धेश शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाच्या कलादिग्दर्शनातही सिद्धेश यांचे सहकार्य लाभले आहे. त्यासोबतच नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ या सिनेमांतही सिद्धेश यांनी आपले योगदान दिले आहे. ‘कॉफी विथ करण’ आणि ‘लॅकमे फॅशन विक समारंभाचे सेटस् त्यांनीच उभारले आहेत.

गणेशोत्सवातील सिद्धेश शिंदे यांचं काम म्हणजे त्यांनी यंदा परळच्या लाल मैदान गणेशोत्सव मंडळासाठी आणि ‘अंधेरीचा राजा’साठी देखावे तयार केले आहेत. नितीन देसाईंपासून बरंच काही शिकल्यानंतर त्यांनी स्वतःचे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली असून त्यातलेच हे दोन प्रोजेक्ट असल्याचं ते अभिमानाने सांगतात. या दोन मंडळांसाठी काय वेगळं केलंत, असं विचारता सिद्धेश शिंदे म्हणतात, लाल मैदानात मी आणि माझ्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन एक पुरातन मंदिर उभारले आहे. हे कुठले विशिष्ट असे मंदिर नसले तरी त्यातून पुरातन मंदिरांबाबत प्रेक्षकांना पूर्ण कल्पना येईल. विजेचा खर्च आता खूपच जास्त येत असल्याने तो खर्च वाचवण्यासाठी आम्ही देखाव्यात लामण दिव्यांमध्ये एलईडीचा वापर केला आहे.

‘अंधेरीचा राजा’ मंडळासाठी सिद्धेश यांनी थेऊरच्या चिंतामणीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. लाल मैदानातील गणेश मंडळ आणि अंधेरीचा राजा या दोन्ही मंडळांसाठी सिद्धेश यांनी पूर्णपणे इकोफ्रेंडली साहित्य म्हणून रियुजेबल फायबर आणि कपडय़ांचा वापर केला आहे. आपल्या टीमने केलेल्या मदतीची सिद्धेश यांना पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच हे काम आपल्या एकटय़ाचे नसून आमच्या टीमने मिळून केल्याचं ते वारंवार सांगतात. टीमबद्दल बोलताना ते म्हणाले, या दोन्हीही गणेश मंडळांसाठी मी माझ्या टीमसोबत पूर्ण प्रोजेक्ट आखून ते पूर्ण केलेत. गेला महिनाभर आम्ही मेहनत घेतली. माझ्यासोबतच शशांक कदम हेही या प्रोजेक्टमध्ये होते. यात सांगायचं म्हणजे हा देखावा पूर्णपणे लोकांना आत्मिक भावनिक समाधान मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

सिद्धेश शिंदे यांनी इंटिरीयर डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी नितीन चंद्रकांत देसाईंसोबत 4 वर्षे सहाय्यक म्हणून काम केलं. मग आता ते स्वतःचे प्रोजेक्ट करायला सज्ज झाले आहेत.

आजचे देखावे कमर्शियल

गणेश मंडळामधील आजकालच्या देखाव्याबाबत बोलतानाही सिद्धेश शिंदे योग्य तेच बोलले. आजचे देखावे कमर्शियल झाले आहेत. त्यातही प्रत्येक मंडळाच्या आर्थिक क्षमतेवर आणि त्यांच्या कला दिग्दर्शकावर हे देखावे जास्त अवलंबून आहेत. जसा पैसा असेल तसे देखावे केले जातात. पण अलीकडे सर्वच कमर्शियल झालंय. ते चांगलं आहे, पण त्यातूनच आपली संस्कृती जपावी लागणार आहे. ते या आजकालच्या मंडळांमधून जपली जातेय का ते पाहणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या