
आपल्या उंच आणि सुबक मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या खेतवाडीत दरवर्षी गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त भेट देत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील 31 मंडळांनी एकत्र येत यंदा लहान मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या विचारात आहे. अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळातर्फे याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात वाढत असलेल्या हा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना लहान मूर्ती आणि उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळाने वरील निर्णय घेण्याच्या विचार सुरू केला आहे. मुंबईत गणेशोत्सवाची वेगळीच शान आहे. उंच अशा गणेशमूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी विविध मंडळे प्रसिद्ध आहेत. अशाच उंच आणि आकर्षक देखाव्यांसाठी खेतवाडी येथील गणेशोत्सव मंडळे प्रसिद्ध आहेत. दरवर्षी येथील 31 गल्ल्यांमध्ये उंच आणि सुबक मूर्ती पाहण्यासाठी राज्यभरातून गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण यंदा उत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने येथील उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शासनाला सहकार्य करत यावर्षीचा उत्सव हा अगदी साधेपणाने आणि जनतेची काळजी घेऊन करण्याचा विचार या मंडळांनी केल्याचे समजत आहे. यावर्षी खेतवाडीमध्ये कोणत्याही ठिकाणी मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळणार नाहीत. तर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शासनाच्या नियमांचे पालन करत बाप्पाची लहान मूर्ती आणून हा उत्सव साजरा करण्याचा मानस या मंडळांनी केला आहे.
तर दुसरीकडे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यंदा पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे येथील अनेक मंडळांनी शाडुच्या मुर्तीसाठी आग्रह धरला असून त्याबाबत हालचाली सुरु केल्याची माहितीदेखील येथील अनेक मंडळांकडून देण्यात आली आहे. याबद्दल अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळाचे सचिव नलीन मोदी म्हणाले की, दरवर्षी खेतवाडीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक बाप्पाच्या उंच मूर्ती आणि देखावे पहायला गर्दी करतात. पण यंदा सामाजिक भान लक्षात घेऊन आणि भाविकांसह कार्यकर्त्यांची काळजी म्हणून आम्ही लहान मूर्ती आणण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.





























































