
कॉलेजवयीन मुला-मुलींसाठी त्यांच्या कॉलेजचं फेस्टिव्हल हा एक धमाल सोहळा असतो. इथे केलेल्या मजेची आठवण अनेकांना आयुष्यभरासाठी छान आठवणी देऊन जाते. पण, हेच कॉलेज फेस्टिव्हल दिल्लीतील तरुणींसाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखं ठरलं आहे. दिल्लीतील गार्गी महाविद्यालयाच्या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये घुसखोरांनी हैदोस घातल्याचं वृत्त आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील गार्गी महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एका कलाकाराचा कार्यक्रम होणार होता. दुपारी तीन वाजल्यापासून कॉलेजच्या प्रांगणात गर्दी वाढायला सुरुवात झाली आणि गर्दीचा फायदा घेऊन अनेक जण प्रांगणात घुसले. हे घुसखोर महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हते, तर 30 ते 35 वयोगटातील पुरुष होते. त्यांचा या महोत्सवाशी काहीही संबंध नव्हता. ते फक्त विद्यार्थिनींना त्रास देण्यासाठीच कॉलेजमध्ये घुसले होते.
गेटच्या आत घुसल्यानंतर त्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली. त्यांमध्ये अनेक टोळकी असल्याने त्यांनी विद्यार्थिनींची छेड काढायला सुरुवात केली. काहींची मजल त्यांच्या समोरच कपडे उतरवून हस्तमैथुन करण्यापर्यंत गेली. हा प्रकार पाहून विद्यार्थिनींमध्ये एकच गोंधळ उडाला. गर्दीचं प्रमाण प्रचंड असल्याने अनेक जणींना तिथून बाहेर पडता आलं नाही. या वेळी तिथे महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा होती. शिवाय पोलीसही उपस्थित होते. विद्यार्थिनींनी त्यांच्याकडे मदत मागितली. पण, कुणीही त्यांना मदत केली नाही, असा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे. काही विद्यार्थिनी प्राचार्यांकडेही गेल्या. मात्र, तिथेही त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे.




























































