
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आणि मराठीचा प्रसार-प्रचार वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक मराठी मन झगडतंय. मराठी ही अभिजात भाषा आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा यासाठी झी मराठी वाहिनी ‘गर्जतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम रविवार, 27 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहे. या दोन तासांच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात नृत्य, कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमातून मराठी साहित्याचे दर्शन प्रेक्षकांना घडेल.
‘अभिजात मराठी जन अभियानाला’ला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनी सादर करत आहे. या अभियानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कौशल इनामदार यांनी ‘अभिजात मराठी गौरव गीत’ याची रचना केली आहे. तीदेखील प्रेक्षकांना या विशेष कार्यक्रमात पाहायला मिळेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री गिरिजा ओक आणि हृषिकेश जोशी करणार असून स्पृहा जोशी, संदीप पाठक, किशोर कदम, विभावरी देशपांडे आणि चंद्रकांत काळे यांच्याकडून प्रेक्षकांना दर्जेदार कविता ऐकायला मिळतील. तसेच मंगेश बोरगावकर, हृषिकेश रानडे, केतकी भावे आणि धनश्री देशपांडे यांच्याकडून सदाबहार गाणी आणि मयूरेश पेम, धनश्री काडगावकर, शुभंकर तावडे आणि केतकी पालव या कलाकारांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘गर्जतो मराठी’ रविवारी सायंकाळी 7 वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर बघता येईल.



























































