भरलेले गॅस सिलिंडर चोरून मित्रांना विक्री करणाऱया तिघा चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळ व ताडदेव परिसरातून भारत गॅस तसेच एचपी गॅसचे सिलिंडर, तीनचाकी रिक्षा चोरणारी एक टोळी ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या चोरटय़ांनी भरलेले गॅस सिलिंडर चोरून ते घाटकोपर व चेंबूर येथील आपल्या मित्रांना विकले होते.

वरळी-कोळीवाडय़ात राहणारे केशव धर्मा यांनी त्यांच्या ताब्यातील एक तीनचाकी रिक्षा व त्यात असलेले भारत गॅस कंपनीचे एकूण 20 सिलिंडर चोरी झाल्याची तक्रार ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिली होती. अशाच प्रकारचा गुन्हा ताडदेव पोलीस ठाण्यातदेखील झाला होता. ताडदेव परिसरात तीनचाकी रिक्षा आणि एचपी पंपनीचे 11 सिलिंडर चोरण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिलेल्या सूचनांनुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर चोरी झालेली एक रिक्षा अंधेरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती काढून मानखुर्द येथून पप्पूराम बिष्णोई, दिलीप पांढरे आणि अनिल यादव या तिघांना पकडले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुह्यांची कबुली दिली. चोरलेले गॅस सिलिंडर त्यांनी घाटकोपर आणि चेंबूर परिसरात राहणाऱया मित्रांना विकल्याची कबुली दिली.