छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस टँकरला अपघात, परिसरातील घरगुती गॅस बंद ठेवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका गॅस टँकरला अपघात झाला आहे. जालना रोडवर, सिडको बस स्थानकाजवळच्या उड्डाणपुलावर ही दुर्घटना घडली आहे. पुलाच्या दुभाजकाला हा टँकर धडकला होता ज्यानंतर त्यातून वायू गळती सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या परिसरातील नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरातील गॅसचा वापर करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस टँकरला जालन्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला. गुरूवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. हा टँकर सिडको उड्डाण पुलाजवळ आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने सर्विस रोड आणि उड्डाणपूल यामध्ये असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळला. यामुळे टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.  असे असले तरी कोणता अनर्थ होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आठ ते दहा टँकरद्वारे, गॅस गळतीवर उतारा म्हणून पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.

अपघात परिसरात वाहतूक बंद

शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक पोलिसांनी बंद केली असून ती इतर मार्गाने वळविली आहे.च जळगाव रोड व कामगार चौक परिसरातील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे

घटनास्थळावर रुग्णवाहिका तैनात

या दुर्घटनेमुळे कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचे सगळे उपाय करण्यात आले आहेत. अपघात स्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांना घरगुती उपकरणे सुरू न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.