
वेण्णा नदीतून पाणी पिऊन परतणाऱया गव्याला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यानंतर बिथरलेला हा गवा लिंगमळा येथील ग्रीन वूड सोसायटीतील विहिरीत पडल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. या रानगव्याचे वजन अंदाजे एक टनाहून अधिक असून, ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’चे जवान व वन विभागाची एक टीम या बचावकार्यात सक्रिय झाली आहे.
महाबळेश्वरपासून चार किलोमीटर अंतरावर पाचगणी मुख्य रस्त्यावर लिंगमळा परिसरात ग्रीन वूड सोसायटी आहे. या सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच 20 फूट रुंदीची विहीर आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वेण्णा नदीच्या पात्रात एक रानगवा पाणी पिण्यासाठी आला होता.
मुख्य रस्ता ओलांडून तो पुन्हा जंगलात जात असताना ग्रीन वूड सोसायटीसमोरच एका वाहनाची त्याला धडक बसली. त्यामुळे बिथरलेला हा रानगवा ग्रीन वूड सोसायटीमध्ये घुसला. मात्र, सोसायटीच्या संरक्षक भिंतीमुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही. रस्ता शोधत हा गवा विहिरीच्या दिशेने गेला. दरम्यान, सोसायटीत गवा घुसल्याची खबर वन विभाग व पोलिसांना मिळाली. पोलिसांसह वन कर्मचाऱयांनी सोसायटीत दाखल होत गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नसल्याने तो विहिरीच्या अवतीभोवती फिरत असतानाच अचानक तो या विहिरीत पडला.
वन विभागाने याबाबतची माहिती ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’च्या जवानांना दिली. ट्रेकर्सची टीम तातडीने दाखल होत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बचावकार्यास सुरुवात झाली. विहिरीवर लोखंडी जाळी असल्याने गव्याला विहिरीबाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. गवा विहिरीत बुडण्याची शक्यता ओळखून ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ने दोरखंडाच्या साहाय्याने या गव्याची शिंगे बांधून तो पाण्यावर तरंगेल अशी व्यवस्था केली
आहे. वन विभागाने एक टन क्षमतेची क्रेन मागविली असून, कोल्हापूर येथून आपत्कालीन व्यवस्था पाहणाऱया तज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रेकर्स टीमकडून विहिरीवरील लोखंडी जाळी कापून विहिरीवरील भाग मोकळा करण्यात येत आहे. सायंकाळी अंधार असल्याने बचावकार्यात मोठय़ा अडचणी येत होत्या.
या बचावकार्यात वन विभागाच्या कर्मचाऱयांसह ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’चे सुनील भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे, अनिल केळगणे, नीलेश बावळेकर, प्रशांत आखाडे, संजय शिंदे, देवेंद्र चौरसिया, अनिल भिलारे, अंकुश बावळेकर आदी सक्रिय आहेत.































































