
>> महेश उपदेव
विदर्भात महालक्ष्मीच्या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. घरोघरी महालक्ष्मीची स्थापना होते.
ज्येष्ठा गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर भाद्रपद सप्तमी च्या मुहूर्तावर होते, भाद्रपद शुद्ध अष्टमीला विधीवत पुजा व नवैद्य दाखविला जातो,
ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते
सोळा अंकाला विशेष महत्व आहे, सर्व झाडांच्या सोळा पत्र्या महालक्ष्मी ला अर्पन केल्या जातात, काही ठिकाणी फुलोरा मध्ये सोळा पात्या, करंज्या, वेणी फनी चकरी करण्यात येते, यात मुख्य नवैद्य सोळा भाज्या( सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र शिजवल्या जातात, आणि ज्वारी ची आंबिल हा मुख्य प्रसाद असतो, तिसरया दिवशी मुरड पोळी, आंबील कढी याचा नवैद्य दाखविला जातो, सायंकाळी जड अंतकरणाने निरोप दिला जातो.
तीन दिवसपर्यंत हा उत्सव सुरू असतो. पहिल्या दिवशी महालक्ष्मीसह कनिष्ठा आणि त्यांच्या दोन पुत्रांचा आगमन होते. पूजा पाठ करून विधिवत त्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या विशेष नैवेद्याचे कार्यक्रम असतो. त्यामध्ये महालक्ष्मीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. त्याचप्रमाणे 56 भोग असतो. जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन देवीच्या मूर्ती साकारल्या जातात. तीन भागांमध्ये या मूर्ती विभागलेल्या असतात. खालचा भागाला पायली म्हणतात. मध्यंतरी शरीराचा भाग आणि वरती मुखवटा अशा प्रकारे महालक्ष्मीची मूर्ती तयार होते. त्यांचे तीन दिवसपर्यंत पूजन केले जाते. या सणाला विदर्भामध्ये महालक्ष्मीची पूजा असं म्हणतात. त्याला फार मोठा महत्त्व असतं. महालक्ष्मीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
काही गावांत या गौरी सोन्या-चांदीचे वा पितळेचे मुखवटे धारण करणाऱ्या असतात. त्याना चांगल्या साड्या नेसवून दागदागिन्यांनी नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावर गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद आणून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावांत अशी प्रथा आहे की, नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणावयाचे आणि तेच पूजावयाचे. गंमत अशी की, कित्येक ठिकाणी तर मातीचे लहान लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पूजतात.
खांद्यापर्यंत आकाराच्या एक-दीड फुटाच्या सालंकृत, साड्या नेसवलेल्या साचांवर मुखवटे चढवले की मूर्तिमंत गौरी प्रकट व्हायच्या. मग पुढचे दोन-अडीच दिवस या माहेरवाशिणींच्या कौतुकात घरातल्या सासुरवाशिणी आणि खास गौरींसाठी आलेल्या माहेरवाशिणी रंगून जायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ फुले, गजरे, आरती, नैवेद्याच्या परोपरी आणि मुख्य म्हणजे गौरींची सालंकृत रूपे आणि भोवतालची सजावट यात बायकांच्या पारंपरिक कलाकौशल्यांची उधळण झालेली असायची. आज- अजूनही थोड्याफार फरकाने ज्या घरी गौरी बसतात, त्या बहुसंख्य घरांत असंच वातावरण असतं. गौरींचा उत्सव प्रामुख्याने स्त्रीप्रधान!
विदर्भातल्या गौरींचा (लक्ष्म्यांचा) नैवेद्यही वऱ्हाडी अघळपघळ प्रवृत्तीसारखाच! जोंधळ्याची आंबील हवीच! बहुधा गोड. कधी तिखट–खारी. तीही सत्यनारायणाच्या प्रसादासारखी सव्वा पटीत! सव्वा पावशेर/शेर/पायली! आंबील शिजवलेलं मोठ्ठं पातेलं तसंच लक्ष्म्यांपुढे! मग पुरणपोळी, १६ भाज्या वगैरे आहेच! जेवायला खूप लोकांना बोलवायचं. आंबिलीचे पावित्र्य मोठे. इथे तिथे हात धुवायचा नाही- अंगणात एका खास खड्ड्यातच हात धुवायचे! ‘समुद्र’ म्हणतात त्याला. नंतर तो खड्डा बुजवायचा! हळदी-कुंकवाला येणारी प्रत्येकजण लक्ष्मीची खणा-नारळांची ओटी आणि ऐपतीनुसार धान्य घेऊन येणार! पुन्हा गृहिणीने ती सगळी ‘रास’ घटस्थापनेपूर्वी घरातच पै-पाहुण्यांसाठी पदार्थ खाऊ घालूनच संपवायची. उचलून घराबाहेर काही न्यायचं नाही.
अनेक ठिकाणी नैवेद्याच्या वेळी कणकेचे १६, कुठे ३२ दिवे आणि मुठे करून केळीच्या पानाभोवती ठेवायचे! नैवेद्य केळीच्या पानावरच वाढायचा. वाढून झालं की वऱ्हाडात त्या खोलीचं दार काही काळ बंद ठेवतात. आत लक्ष्म्या जेवतात ना! दार उघडलं की बारकाईनं पान बघायचं. कोणकोणते पदार्थ उष्टावले गेले, सर्व भाज्या खायच्या असतात.

३१४ वर्ष जुन्या महालक्ष्मी

सिनीयर भोसला पॅलेस सिनीयर भोसला पॅलेस येथील 314 वर्ष जुन्या चांदीच्या महालक्ष्म्या व गणपती.
इसवी सन 1708 पासून पंरपरेनुसार चालत आलेल्या नागपूरच्या महाल येथील राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या सिनीयर भोसला पॅलेस येथे ह्या वर्षापर्यंत 314 वर्ष पुर्ण झालेले आहेत . जुन्या अलंकार जडीत चांदीच्या महालक्ष्मीची स्थापना परंपरेनुसार याही वर्षी ( 2022 ) होत आहे . त्याच प्रमाणे 1708 पासून स्थापन झालेल्या एकसारखी श्री . गणेशाची मुर्ती सुध्दा स्थापन झाली आहे . या गणपतीची विशेष 314 वर्षापासून एका आकाराचा , एका रंगाचा नागपूरकर भोंसले कालीन सिरपेजतुरा असलेली पगडी घालून या गणपतीरायांना पालखीत आणले जात व विर्सजनाच्या दिवशी पण पालखीत जातात अशी श्री गणेशाची विशेषतः आहे . विदर्भात हा सण गरीब असो की श्रीमंत आप आपल्या परिस्थिती नुसार मोठया धुमधडाक्यात साजरा करतो. गेली दोन वर्ष कोरोना मुळे हा सण साजरा करता आला नव्हता पण यावर्षी भक्तांचा उत्साह वाढला आहे.
गौरी आवाहन (दिवस पहिला)
आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.
गौरीपूजन (दिवस दुसरा)
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.
विसर्जन (दिवस तिसरा)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. महालक्ष्मी च्या आगमना नंतर घरात एक चैतन्य निर्माण होते, या सणाची महिला वर्ग आतुरतेने वाट पहात असते.



























































