
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या आक्रमक आणि बेधडक विधानांची नेहमीच चर्चा होते. अर्थात त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची कामगिरी एवढी खास झालेली नाही. मात्र इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केले आणि एजबॅस्टनमध्ये झेंडा फडकावत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता दोन्ही उभय संघात लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना सुरू असताना गंभीरने चेतेश्वर पुजारासोबत बोलताना आपला इरादा स्पष्ट जाहीर केला.
रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन यासारख्या बड्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा नवखा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. शुभमन गिल याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या दौऱ्यात टीम इंडियाची खरी कसोटी होणार असून गौतम गंभीरसाठीही हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण गेल्या वर्षी प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून टीम इंडियाची कसोटीतील कामगिरी यथातथाच राहिलेली आहे. इंग्लंडमध्ये मालिकेत बरोबरी साधलेली असली तरी आगामी तीन कसोटीत संघाची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
इंग्लंड दौरा सुरू होण्याआधी गंभीरच्या आईची तब्येत बिघडल्याने तो मायदेशी आला होता. त्यानंतर पहिल्या कसोटीपूर्वी त्याने इंग्लंड गाठले. याचबाबत पुजारासोबत बोलताना गंभीर म्हणाला की, कुटुंबाची जबाबदारी महत्त्वाची आहेच, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की आम्ही इथे खास उद्देशाने आलो आहोत. इथे सुट्ट्या घालवण्यासाठी आलेलो नाही. कारण खूप कमी लोकांना इथपर्यंत पोहोचता येते.
यावेळी गंभीरने एजबॅस्टन कसोटीत हिंदुस्थानचा दुसरा डाव उशिरा घोषित करण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. इंग्लंडच्या संघाला विजयाची थोडीही संधी ठेवायची नाही, असा माझा आणि संघाचा विचार होता. शेवटच्या दिवशी आम्ही इंग्लंडला त्यांच्याच शैलीत खेळायला भाग पाडले. त्यांचा डाव 271 धावांवर कोसळला आणि टीम इंडियाने विजय मिळवला, असेही गंभीर म्हणाला.
लॉर्ड्सवर बॅझबॉलची आक्रमकता गायब, इंग्लंडच्या आघाडीवीरांची कसोटी क्रिकेटच्या शैलीत फलंदाजी
तो पुढे म्हणाला की, सर्व गोष्टी आमच्या बाजुने झाल्या नसत्या तर या निर्णयावर लोकांनी टीका केली असती. पण आम्ही टीका सहन करण्यास तयार आहोत. ही आमची जबाबदारी आहे. पण डाव उशिरा घोषित करण्याचा निर्णय योग्यच होता. चौथ्या दिवशी आम्ही 10-15 षटकांची गोलंदाजी केली. धावफलकावरही चांगल्या धावा होत्या आणि पाचव्या दिवशी आम्ही ताज्या दमाने गोलंदाजी केली. तो एक मास्टरस्ट्रोक होता, असेही गंभीर म्हणाला.