सुनील गावस्कर यांचा इम्रान खानबाबत मोठा खुलासा, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी नुकतीच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.याच इम्रान खानमुळे आपल्याला जीवनातील एक मोठा निर्णय बदलावा लागला होता असा खुलासा लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी केला आहे.

१९८६ साली  भारत इंग्लंड दौर्‍यावर होता. दौरा संपल्यावर गावस्कर निवृत्ती  जाहीर करण्याच्या विचारात होते. योगायोगाने त्याचवेळी इम्रान खान हा देखील लंडनमध्ये होता. सुनील गावस्कर आणि इम्रान खान यांनी एका इटालियन रेस्टॉरेंटमध्ये जेवणाचा बेत आखला होता. जेवत असताना गावस्कर यांनी इम्रानला त्यांच्या निवृत्तीच्या विचाराबाबत सांगितले. यावेळी इम्रान खान याने गावस्करांना दिलेल्या आव्हानामुळे आपण निवृत्तीचा बेत बदलल्याचं गावस्कर यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

इम्रान खान याने निवृत्तीबाबत ऐकल्यानंतर गावस्कर यांना म्हटलं की “तू आताच निवृत्त होऊ शकत नाही. पाकिस्तान पुढच्या वर्षी भारत दौर्‍यावर येणार आहे, आणि मला हिंदुस्थानला स्वगृही हरवायचे आहे. जर तू टीम मध्ये नसशील तर त्यात मजा नाही. एक अंतिम मुकाबला होऊन जाऊदे असं आव्हान इम्रान खान याने आपल्याला दिल्याचं गावस्कर यांनी म्हटलं आहे. अर्थात गावस्कर यांनी हे आव्हान स्वीकारलं. पाकिस्तानी संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आला आणि त्यांनी मायदेशातच आपल्याला 1-0 फरकाने हरविले. पाकिस्तानने हिंदुस्थानला मायदेशात पहिल्यांदाच हरविले होते.