
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या गावस्कर ट्रस्टला वांद्रे पश्चिम येथे क्रिकेट अकादमीच्या स्थापनेसाठी एक मुख्य भूखंड देण्यात आला होता. इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी 1980 च्या उत्तरार्धात सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला 21,348 चौरस फुटांचा भूखंड देण्यात आला होता. 2019 मध्ये म्हाडाने हा भूखंड परत ताब्यात घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला. यात क्रिकेट अकादमी आणि ट्रस्टसोबतचा तुमचा करार रद्द करा असे म्हटले होते.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नव्या आवाहनानंतर गावस्कर यांनी आता हा भूखंड म्हाडाला परत केला आहे. यासंदर्भात गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. क्रिकेट अकादमीचा नियोजित विकास करू शकत नसल्यामुळे मी ही जमीन परत देत आहे. असे ते म्हणाले.
गावस्कर यांच्या ट्रस्टसोबतचा करार रद्द करण्याची विनंती म्हाडाने डिसेंबर 2019 मध्ये सरकारला केली होती. त्यानंतर गावसकर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एका संयुक्त उपक्रमासाठी निवडले आणि दोघांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर गावस्कर यांनी आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांन क्रिकेटचे दोन दिग्गज वांद्रे येथील भूखंडावर अकादमी उभारू शकतात का? अशी विचारणा म्हाडाला केली.
माझे स्वप्न असलेल्या अकादमीच्या स्थापनेला मी न्याय देऊ शकणार नाही. म्हणून माझ्या ट्रस्टने जमीन सरकारला परत केली आहे. जर म्हाडाला क्रिकेटच्या विकासासाठी माझ्याकडून काही मदत हवी असेल तर मला मदत करण्यात आनंद होईल असे गावस्कर यांनी सांगितले.
म्हाडाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ट्रस्टने 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर जमीन घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत अकादमी बांधणे अपेक्षित होते. 1999, 2002 आणि 2007 मध्ये अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली होती. 2011 मध्ये, म्हाडाला भूखंडावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर. , ट्रस्ट विरुद्ध कारवाई प्रस्तावित होती.
याबद्दल आव्हाड म्हणाले की, खेळासाठी असलेल्या जमिनीचा विकास कशा प्रकारे करता येईल यावर आमही पर्याय शोधत आहोत. 30 वर्षांहून अधिक काळ वापरात नसलेल्या जमिनीचा विकास कसा करता येईल हे आम्ही लवकरच ठरवू.

























































