हेलिकॉप्टर दुर्घटनेची त्रिस्तरीय चौकशी, संशय वाढला… घात की अपघात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 24 तासांनंतरही अवघा देश सुन्न आहे. हा अपघात होता की भयंकर घात? असा संशय वाढला आहे. दरम्यान, या अपघाताची त्रिस्तरीय चौकशी करण्यात येणार असून, एअरमार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत केली.

संसदेच्या दोन्ही सभागृहात सीडीएस जनरल बिपीन रावत, 11 वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन केले. अपघाताचा घटनाक्रम सांगितला तसेच त्रिस्तरीय चौकशी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह

लाइफ सपोर्टवर; बंगळुरूला हलविणार

हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव अधिकारी बचावले आहे. ते 45 टक्के भाजले असून, वेलिंग्टन लष्करी हॉस्पिटलमध्ये लाइफ सपोर्टवर आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने बंगळुरू येथील कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी इशारा देऊनही भाजपच्या बहुसंख्य खासदारांची दांडी

स्वतःमध्ये बदल करा नाहीतर बदल आपोआप घडतील, असा इशारा संसेदत दांडी मारणाऱया भाजप खासदारांना पंतप्रधानांनी नुकताच दिला होता, मात्र त्याचा काडीचाही परिणाम भाजपच्या खासदारांवर झाला नसल्याचे आज सकाळी प्रश्नोत्तराच्या तासांत दिसून आले. जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याची कल्पना असतानाही भाजपा खासदारांनी संवेदनशून्यता दाखविली. सकाळी कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत भाजपचे केवळ 58 खासदार उपस्थित होते तर 90 खासदार विरोधी बाकावर होते. त्यानंतर पंधरा मिनिटांत भाजप खासदारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली, मात्र तोपर्यंत जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहून झाली होती.

निलंबित खासदारांचे आंदोलन सुरूच

राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी आजही संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आपले धरणे आंदोलन सुरूच ठेवले.

श्रद्धांजली वाहताना मौन पाळले नसल्याचा विरोधकांचा आरोप

हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली देण्यावरूनही आज लोकसभेत दुर्दैवी राजकारण पाहायला मिळाले. जनरल रावत यांच्यासह या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनाच सभागृहाने श्रद्धांजली वाहिली, मात्र यावेळी उपस्थित सदस्यांना मौन पाळू दिले गेले नाही, असा आरोप विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी केला. लोकसभेत कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेतही जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पालम विमानतळावर सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वनही केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनीही मृतांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

संरक्षणमंत्र्यांनी काय माहिती दिली?

तामीळनाडूतील सुलूर एअरबेसवरून बुधवारी सकाळी 11.48 वाजता हवाईदलाच्या एमआय-17 व्ही-5 या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यामध्ये जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 11 वरिष्ठ अधिकारी, स्टाफ असे 14 जण होते.

हेलिकॉप्टर दुपारी 12.15 वाजता वेलिंग्टन येथे पोहचणार होते. पण दुपारी 12.8 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. हेलिकॉप्टर कुन्नूरनजीकच्या जंगलात कोसळले.

या दुर्घटनेची त्रिस्तरीय चौकशी करण्यात येईल. एअरमार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीने कालच बुधवारी अपघातस्थळी आणि वेलिंग्टन येथे भेट देऊन पाहणी केली आहे.

तिघांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

भीषण दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असला तरी फक्त सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर या तिघांच्याच मृतदेहाची ओळख पटली आहे. त्यामुळे या तिघांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी दिल्ली लष्करी छावणीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या इतरांची ओळख पटवण्यासाठी त्यांची डीएनए टेस्ट केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

ब्लॅक बॉक्स मिळाला

अपघातानंतर दोन बॉक्स सापडले त्यात ब्लॅक बॉक्सही आहे. अपघातस्थळापासून 300 मीटर ते एक किलोमीटर परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले. त्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघात नेमका कसा आणि कधी झाला याचा उलगडा होऊ शकेल.

नवे सीडीएस कोण? लष्करप्रमुख नरवणे यांची चर्चा

जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) पद रिक्त झाले आहे. देशाच्या संरक्षण दलांतील हे सर्वोच्च पद आहे. हे पद एक दिवसही रिक्त ठेवू शकत नसल्याने पदाची तात्पुरती जबाबदारी व्हाईस सीडीएस एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवीन नियुक्तीसाठी पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालयाने मंथन सुरू केले असून 5 ते 7 दिवसांत नियुक्ती केली जाणार आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते, अशी राजधानीत चर्चा आहे.

ब्रिगेडियर लिड्डर बनणार होते ‘मेजर जनरल’

हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर हे देशातील शूर लष्कर अधिकाऱयांपैकी एक होते. त्यांना लवकरच ‘मेजर जनरल’ पदावर बढती मिळणार होती. ते मूळचे हरयाणातील पंचकुला येथील होते. मागील वर्षभराहून अधिक काळ ते संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्टाफमध्ये ‘डिफेन्स असिस्टंट’ म्हणून सेवेत होते. लवकरच जनरल रावत यांच्या स्टाफमधून बाहेर पडून ते ‘डिव्हिजन ऑफिसर’ची धुरा सांभाळणार होते.