विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नांवर युवासेना आक्रमक; सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे सिनेट सदस्यांचा सभात्याग 

विद्यार्थी आणि शिक्षक यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरून मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत आज युवासेना आणि बुक्टू संघटनेचे शिक्षक सिनेट सदस्यांनी आक्रमक रूप धारण केले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर 20 स्थगन प्रस्ताव दिले असताना त्यापैकी केवळ एकच स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याने युवासेना आणि बुक्टू सिनेट सदस्यांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत कुलगुरूंसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आढळलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या फोटोकॉपींची प्रत कुलगुरूंना देण्यात आल्या तसेच काही प्रश्न तपासले नसल्याचे निदर्शनाला आणून दिले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्याचप्रमाणे परीक्षा विभागाचा गोंधळ, पदवी प्रमाणपत्रामध्ये झालेला चुकीचा अहवाल सभागृहात सादर न करणे अशा विविध प्रश्नांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे. याप्रकरणी युवासेना आणि बुक्टूचे सिनेट सदस्य लवकरच राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या ही बाब निदर्शनाला आणणार आहेत. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, धनराज कोकाटे, अल्पेश भोईर, स्नेहा गवळी, परम यादव, किसन सावंत आदी उपस्थित होते.

फलक झळकावून केला निषेध 

मुंबई विद्यापीठ सिनेट सभेत युवासेना सिनेट सदस्यांनी सहभाग घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सिनेट सदस्यांनी सभा सुरू होण्यापूर्वी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फलक झळकावून प्रशासनाचा निषेध केला.