जनता त्रस्त! बचत नाहीच; खाण्या-फिरण्यावरच पैसे खर्च महागाईवर उतारा काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ इंधन दरवाढच नाही तर अन्नधान्य, खाद्यतेल, भाज्या, फळे अशा सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य जनता महागाईने अक्षरशः होरपळून निघत असून बचत तर काही होत नाहीच उलट खाण्या-फिरण्यावरच सगळे पैसे खर्च होत आहे. साधे लिंबू 10 ते 25 रुपयांना झाले असून महागाईवर आता उतारा काय? असा सवाल जनता करत आहे. ग्राहक महागाई निर्देशांकानुसार देशात महागाईने 17 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर गेला आहे.

कोरोनानंतर महागाईची लाट

  • कोरोना महामारीनंतर देशात जणू महागाईची लाटच आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात एक महिन्यात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलिटर 120 रुपयांवर गेले आहे. डिझेल 100 रुपये प्रतिलिटर झाले. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर फिरणे महागले आहे. मालवाहतूक दरात वाढ झाल्याने सर्वच वस्तूंची दरवाढ झाली.
  • इंधन दरवाढीमागे युक्रेन-रशिया युद्धाचे कारण केंद्र सरकार देते, परंतु विधानसभा निवडणुकांचे तीन महिने वगळता 2021 पासूनच इंधन दरवाढ होत आहे.
  • खाद्यतेल वर्षभरात तब्बल 50 ते 100 टक्क्यांनी महागले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 98 रुपये प्रतिलिटर मिळणारे सूर्यफूल तेल 180 ते 250 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. देशात प्रामुख्याने सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबिन आणि मोहरी तेलाचा सर्वाधिक वापर फोडणीसाठी केला जातो. महागाईमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे.
  • चांगल्या प्रतीचे खाद्यतेल महाग झाल्यामुळे लोकांना निकृष्ट प्रतीचे तेल वापरावे लागत आहे. देशातील 24 टक्के घरांमध्ये निकृष्ट प्रतीचे तेल वापरले जात आहे. यामुळे अनेकांना पोटाचे विकार, कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची भीती एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

जगभरात महागाई वाढली पण…

  • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात महागाई वाढली असल्याचे वृत्त आहे. मात्र, अमेरिका, युरोपातील महागाईच्या दराची तुलना करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाचा विचार केल्यास हिंदुस्थानात महागाईचे चटके जास्त बसत आहेत.
  • हिंदुस्थानात महागाई 6.95 टक्क्यांवर गेली, तर अमेरिकेत महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक 8.5 टक्के झाला आहे. मात्र, हिंदुस्थानी नागरिकांपेक्षा अमेरिकन जनतेचे दरडोई उत्पन्न कित्येक पटीने जास्त आहे.
  • ब्रिटनमध्ये महागाई 7 टक्क्यांवर गेली आहे. चीनमध्ये 8.3 टक्के दर आहे.
  • आपल्या शेजारील देश श्रीलंका महागाईमुळे उद्ध्वस्त झाला आहे. तर पाकिस्तानात महागाई विक्रमी 12.7 टक्क्यांवर गेली आहे.

एक लिंबू 10 ते 25 रुपयांना

सर्वच भाज्या महागल्या आहेत. एक किलो भाजीसाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत. लिंबाचे दर तर गगनाला भिडले आहेत. एक लिंबू 10 ते 25 रुपयांना असा विक्रमी दर आहे. एक किलोसाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागत आहेत.

ओला-उबरचे भाडे 15 टक्क्यांनी वाढले

पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजी दरात सातत्याने वाढ होत आहे. सीएनजी 72 रुपये प्रतिकिलोवर गेले आहे. त्याचा फटका जनतेला बसला. ओला-उबरच्या दरात 12 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली. n आता रिक्षा-टॅक्सीचालकांनीही दरवाढीची मागणी केली आहे.