
पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या हिमायत बेग याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण अर्थात हा जामीन त्याला जर्मन बेकरी प्रकरणी नव्हे तर नाशिक येथील दहशतवादी कारवायांप्रकरणी देण्यात आला आहे.
हिमायत बेग हा सध्या जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर नाशिक येथील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांवरून त्याच्यावर यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यानुसार, बेग याच्यावर लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी दहशतवादी नियुक्त करण्याचं काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी हिमायत बेगला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
फेब्रुवारी 2010 मध्ये पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 17 जणांचा बळी गेला होता तर 60पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या स्फोटाचा सूत्रधार हिमायत बेग होता. त्याला त्याच प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने त्याची फाशी रद्द करून ती जन्मठेपेत बदलली होती.

























































