
शेजारी हा पहिला नातेवाईक असतो असं म्हणतात. कोणत्याही अडचणीत तो तुम्हाला मदत करण्यात सगळ्यात पुढे असतो. आपल्या सुखदुःखात तो सहभागी होतो. पण, कुठल्या शेजाऱ्याने तुम्हाला कोट्यधीश केलं तर?
असं खरोखर घडलं आहे. जर्मनीत राहणाऱ्या एका महिलेने आपली कोट्यवधींची संपत्ती शेजाऱ्यांना दान केली आहे. या संपत्तीची किंमत तब्बल 7.5 मिलियन डॉलर इतकी म्हणजेच तब्बल 55.35 कोटी इतकी आहे.
2019मध्येच महिलेचा मृत्यू
मध्य जर्मनीतील हेसे इथे राहणाऱ्या या महिलेचं नाव रेनेट वेडेल असं आहे. रेनेट या त्यांचे यजमान अल्फ्रेड वेसेल यांच्यासमवेत 1975 पासून जर्मनीत स्थायिक झाल्या होत्या. 2014मध्ये अल्फ्रेड यांचं निधन झालं. तेव्हापासून त्या एकट्याच राहत. 2016 ते 2019 दरम्यान आजारपणामुळे त्यांच्यावर इलाज सुरू होते, त्यातच त्यांचा वयाच्या 81व्या वर्षी मृत्यू झाला.
बहीण होती खरी वारस
रेनेट यांच्या नावे बँक खाती, शेअर्स आणि अनेक जंगम मालमत्ता होती, ज्याची खरी वारसदार त्यांची बहीण होती. मात्र, रेनेट यांच्या आधीच त्यांची बहीण मृत्यू पावली होती. त्यामुळे रेनेटने त्यांची सारी स्थावर आणि जंगम मालमत्ता आपल्या शेजाऱ्यांना देऊन टाकली.
एप्रिल 2020मध्ये स्थानिक प्रशासनाने त्यांच्या शेजाऱ्यांना या संपत्तीची कल्पना दिली. रेनेट यांच्या बहिणीचा मृत्यू आधीच झाला असल्याने ही मालमत्ता त्यांच्या शेजाऱ्यांच्या नावे करण्यात आली.
त्यांच्या संपत्तीतील एका घराचा वारसा ज्यांच्याकडे जाणार होता, त्याने तो वारसा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ही संपत्ती हेसे हे गाव ज्या जिल्ह्यात आहे, त्या वायपरफेल्डेनच्या नगरपालिकेने विकसित करण्यासाठी घेतली आहे. आता तिथे एक सामाजिक केंद्र उभं राहणार असून त्यातून लोकांना मदत केली जाणार आहे, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.




























































