चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हुकूमशहा! जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

जगभरात सध्या युद्धाचे सावट पसरले असून, रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक राष्ट्र सज्ज झाली आहे. चीन, अमेरिका, जर्मनी आदी राष्ट्रांच्या हालचाली सध्या वेगळ्याच दिसत आहे. यादरम्यान जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेअरबॉक यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटले आहे. जर पुतिन युक्रेनविरुद्ध युद्ध जिंकले तर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंगसारख्या जगभरातील इतर हुकूमशहांना काय संदेश जाईल, असा सवाल त्यांनी केला. यानंतर जर्मनी चीनमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युक्रेनला हे युद्ध जिंकावे लागेल आणि स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा विजय झालाच पाहिजे, असे बेअरबॉक म्हणाल्या.

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्याने संतप्त झालेल्या चीनने तेथे उपस्थित असलेल्या जर्मन राजदूत पॅट्रिशिया फ्लोर यांना तातडीने बोलावून घेतले. त्यांनी राजनैतिक स्तरावर पॅट्रिशिया यांच्याकडे आपला निषेध व्यक्त केला. जर्मनीने केलेले वक्तव्य बेताल आणि चीनच्या राजकीय प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे. चीनला चिथावणी देण्यासाठी हे वक्तव्य करण्यात आले आहे. यापूर्वी जूनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटले होते. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडून बायडेन यांना उत्तर देण्यात आले होते. बायडेन यांचे वक्तव्य हे पूर्णपणे मूलभूत तथ्यांच्या विरुद्ध असून, हे विधान राजनैतिक शिष्टाचाराच्या विरोधात आहे.